साहित्य न पोहोचल्याने केंद्र शनिवारी हलविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:17 AM2021-03-05T04:17:35+5:302021-03-05T04:17:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मायादेवी नगरात रोटरी सभागृहात कोरोना लसीकरण केंद्र हलविण्यात येणार होते व शुक्रवारपासून त्या ठिकाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मायादेवी नगरात रोटरी सभागृहात कोरोना लसीकरण केंद्र हलविण्यात येणार होते व शुक्रवारपासून त्या ठिकाणी लसीकरणाचे नियोजन करण्यात येत होते, मात्र, साहित्य त्या ठिकाणी हलवायला पुरेशी यंत्रणा नसल्याने हे केंद्र आता शनिवारी सुरू होणार असल्याची माहिती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लसीकरणाचे केंद्र वरच्या मजल्यावर असल्याने वृद्धांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. अशा स्थितीत हे केंद्र मायादेवी नगरातील रोटरी सभागृहात हलविण्यात आले. मात्र, गुरुवारी दिवसभर लसीकरण सुरू असल्याने साहित्य हलविणे शक्य न झाल्याने शुक्रवारी हे साहित्य त्या ठिकाणी नेऊन शनिवारी हे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
ते केंद्र का बंद ?
शहरातील गाजरे हॉस्पिटल आणि गोल्ड सीटी हॉस्पिटल या दोन ठिकाणी शासकीय कोरोना लसीकरण सुरू होते. मात्र, ही केंद्र अचानक बंद करण्यात आल्याने गोंधळ वाढला आहे. या ठिकाणी गुरुवारी काही नागरिक गेल्यानंतर गोंधळामुळे त्यांना लस घेता आली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाय महापालिकेने ही केंद्र का बंद केली याची कुठलीच माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाला नसल्याची गंभीर माहिती आहे.
असे झाले लसीकरण
गुरूवारी जिल्ह्यात ११५५ लोकांनी पहिला तर २७९ लोकांनी कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. कोणालाही कसलेच रिॲक्शन आलेले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. यावल केंद्रावर सर्वाधिक १४८ जणांना लस देण्यात आली.
सर्व आरोग्य केंद्रांवर लसीकरण
जिल्ह्यातील शहरी भागातील आरोग्य केंद्रावर शुक्रवारपासून लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली. लसीकरणाचे उद्दिष्ट लवकर पूर्ण करायचे असल्याने केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.