केंद्राच्या माध्यमातून पाणीप्रश्न सोडविणार - रक्षा खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:36 PM2019-05-24T12:36:37+5:302019-05-24T12:37:05+5:30
विशेष मुलाखत
आनंद सुरवाडे
जळगाव :सध्या सर्वत्र पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ आता केंद्र सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यावर आगामी काळात अधिक भर असेल. नागरिकांना मुबलक पाणी मिळण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील राहील़, असे रक्षा खडसे यांनी ‘लोकमत ‘ शी बोलताना सांगितले.
प्रश्न : निकालाबाबत काय वाटते ?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशाच्या जनतेने विश्वास दाखविला आहे़ हा निकाल पूर्णत: एका बाजूने असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे़ मी जनतेची आभारी आहे़ मिळालेल्या संधीचा विकासासाठी पूर्ण वापर करेल़
प्रश्न : या निवडणुकीत कोणते प्रश्न महत्त्वाचे ठरले, की आपला विजय झाला ?
उत्तर : अगदी सुरूवातीपासून जनतेच्या संपर्कात राहून स्थानिक पातळीवरील समस्या जाणून घेण्याचा नेहमी प्रयत्न केला़ केंद्र सरकारच्या जेवढ्याही योजना आहे त्या तळागाळापर्यंत पोहचाव्यात त्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी पूर्ण प्रयत्न केले़
प्रश्न : आगामी काळात कोणत्या प्रश्नांना महत्त्व देणार?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासात्मक दृष्टीकोन घेऊन जी वाटचाल सुरू केली आहे, ती कायम राहील़ तळागाळापर्यंत प्रत्येकाच्या समस्या समजावून त्या सोडविण्याचा प्रयत्न राहिलच़ शिवाय आता सध्या सर्वत्र पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून केंद्र सरकारच्या माध्यमातून हा पाणीप्रश्न सोडविण्यावर अधिक भर असेल़