केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 09:24 PM2018-02-27T21:24:53+5:302018-02-27T21:24:53+5:30
मागविले मतदान केंद्रांचे फोटो
जळगाव: २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्राचे विविध कोनातून घेतलेले ७ फोटो मागविले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ३३६० मतदान केंद्रांपैकी ११३२ मतदान केंद्रांचे फोटो पाठविण्यात आले असून राज्यात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तर कामाला अद्याप सुरूवातच झालेली नसल्याचे समजते.
लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका २०१९ मध्ये होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यासाठी पूर्वतयारीला प्रारंभ केला असून प्रत्येक मतदान केंद्राची माहिती मागविली आहे. त्यासाठी बीएलओंनी प्रत्येक मतदान केंद्राचे विविध कोनातून ७ फोटो काढावायाचे आहेत. त्यात एक फोटो केंद्र ज्या इमारतीत आहे, त्या इमारतीचा असावा. तसेच स्वत: बीएलओने मतदान केंद्रात सेल्फी काढणेही बंधनकारक आहे. मतदान केंद्रावर पाण्याची सोय आहे का? विजेची व्यवस्था आहे का? याचीही माहिती घेतली जात आहे.
जिल्हा आघाडीवर
जिल्ह्यात एकूण ३३६० मतदान केंद्र आहेत. त्यांची फोटोसह माहिती अपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. आतापर्यंत ११३२ केंद्रांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही ६६ टक्के काम बाकी आहे.