Load Shedding In Maharashtra: राज्यात होत असलेल्या भारनियमनाला केंद्र सरकार जबाबदार, गुलाबराव पाटील यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 11:16 AM2022-04-14T11:16:16+5:302022-04-14T11:17:02+5:30
Load Shedding In Maharashtra: राज्यात होत असलेल्या भारनियमनाला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका राज्य सरकारमंधील मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
जळगाव - राज्यात होत असलेल्या भारनियमनाला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका राज्य सरकारमंधील मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून कोळसा मिळत नसल्याने राज्य सरकारवर भारनियमन करण्याची वेळ आली आहे. भारनियमनामुळं शेतकऱ्यांचं, उद्योजकांचं जे काही नुकसान होत आहे, त्याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे, असे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीं केंद्र सरकारवर टीका करताना म्हटलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी केंद्र सरकारने राज्याला कोळसा पुरवठा थांबवला आहे, त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
भारनियमनाच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी भाजपने काढलेल्या आक्रोश मोर्चात खासदार उमेश पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. खासदार पाटील यांनी केलेल्या टीकेचाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी समाचार घेतला. खासदार उन्मेष पाटील यांनी इकडे बोंबा मारण्यापेक्षा केंद्राकडून कोळसा मिळावा म्हणून प्रयत्न केले असते, तर त्यांचा जाहीर सत्कार केला असता. अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी उन्मेष पाटलांना फटकारले आहे. हा पठ्ठ्या राहिला नसता तर उन्मेष पाटील दिल्लीदरबारी गेले नसते, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.