हाॅटस्पाॅट ठरलेल्या पहूरकडे केंद्रीय पथकाची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 11:51 PM2021-03-10T23:51:18+5:302021-03-10T23:51:36+5:30
जामनेर तालुक्यात पहूर हाॅटस्पाॅट ठरला असताना केंद्रातील पथकाने पाठ फिरविल्याचा प्रत्यय पहूर येथे बुधवारी आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पहूर, ता. जामनेर : जामनेर तालुक्यात पहूर हाॅटस्पाॅट ठरल्याची बाब गंभीर असतानादेखील जिल्हा व तालुक्यातील आरोग्य प्रशासनाने ढिसाळ नियोजन ठेवल्याने केंद्रातील पथकाने पाठ फिरविल्याचा प्रत्यय पहूर येथे बुधवारी आला आहे. यामुळे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोविडचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक जळगावात दाखल झाले.जळगावहून औरंगाबादकडे पहूरमार्गे बुधवारी दौरा निश्चित होता. या पथकात नवी दिल्लीतील ई.एम.आर.चे संचालक डॉ. पी. रविंद्रन, पब्लिक हेल्थचे तज्ञ व सल्लागार डॉ. सुनील खापरडे, आय.डी.एस.पी. एन.सी.डी.सी. उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी, व महाराष्ट्र राज्याचे साथरोग नियंत्रक अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांचा पथकात समावेश होता.
त्यांना मार्गस्थ करताना जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांचा ताफ्यात समावेश होता. पहूर येथे कोरोनाने पाय पसरविल्याने तीन जणांना मृत्यूने कवटाळले असून संख्या वाढत आहे. याची कल्पना जिल्हा व तालुक्यातील आरोग्य प्रशासनाला आहे. पण प्रशासनाने पहूर हाॅटस्पाॅट असल्याची माहिती पथकापासून लपवून ठेवल्याने नियोजनात ढिसाळपणा दिसून आला. त्यामुळे पथक पहूर येथे पाहणी न करता सरळ निघून गेले. पथकासाठी पोलीस निरीक्षक राहुल खताळ, माजी सरपंच कसबे व सरपंच पती शंकर जाधव, उपसरपंच श्यामराव सावळे, माजी उपसरपंच योगेश भडांगे, रवींद्र मोरे, ग्रामविकास अधिकारी डी.पी. टेमकर, स्थानिक यंत्रणा सज्ज असताना पथकाने गावास टाळल्याने पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या नियोजनाविषयी नाराजी व्यक्त करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
दिवसभरात २५ बाधित
कसबे ग्रामपंचायतमध्ये बत्तीस जणांची चाचणी घेतली पैकी वीस पाॅझिटिव्ह आले आहेत. यात तीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. व पेठ मधील दोन तसेच सामरोद येथील एक व दोन जण होमक्वारंटाईन आहे. तीन दिवसात तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला असताना पाचव्या दिवशी वयोवृध्द महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याने मयतांची संख्या चार झालेली आहे. एकाच दिवसात २५ जण बाधित आढळल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे, वैद्यकीय अधिकारी विजया पाटील व आरोग्य सेवक सेविकांनी सेवा पुरविली.
जिल्ह्यातील काही हाॅटस्पाॅटची पाहणी पथकाने केली. पहूरचा दौरा नियोजनात नव्हता. औरंगाबाद येथे पाहणी दौरा होता. जिल्ह्यातील पाहणी वरून सर्वच हाॅटस्पाॅटचे गांभीर्य पथकाला आल्याने पहूरच्या पाहणीचा प्रश्न येतो कोठे?
-नागेश चव्हाण,
जिल्हा शल्यचिकित्सक
पहूर येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य प्रशासनाने केंद्रीय पथकाचा पहूर येथे पाहणी दौऱ्याचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र ढिसाळ नियोजनामुळे पथकाने पाठ फिरविली. अधिकाऱ्यांना गांभीर्य दिसत नाही.
-आशा शंकर जाधव,
सरपंच, ग्रामपंचायत कसबे पहूर