जिल्ह्यात कोरोनामुक्त रूग्णांचे शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 03:12 PM2020-05-20T15:12:11+5:302020-05-20T15:12:25+5:30

रूग्णांना डिस्चार्ज : ११० रुग्णांची कोरोनावर मात

Centuries of corona-free patients in the district | जिल्ह्यात कोरोनामुक्त रूग्णांचे शतक

जिल्ह्यात कोरोनामुक्त रूग्णांचे शतक

Next

जळगाव : जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना दुसरीकडे दिलासादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजेच, आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ११० रूग्णांची कोरोनावर मात करीत घरी परतले आहे. या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमधून मान्यवरांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी अतिदक्षता विभागही कार्यान्वित केला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागू नये तसेच रुग्णांना तातडीने व वेळेवर उपचार मिळावेत. याकरीता जिल्ह्याच्या विविध ठिकाणी ७८ कोविड केअर सेंटर, ३६ कोविड हेल्थ सेंटर तर २४ कोविड हेल्थ हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. याचठिकाणी रुग्णांचे स्क्रिनिंग, दाखल करुन घेणे, उपचार करणे, स्वॅब घेणे आवश्यकता भासल्यास क्वारंटाईन करण्यात येत आहे. रुग्णांवर तातडीने व वेळेवर उपचार होत असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २९ टक्के म्हणजेच ११० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

अमळनेर तालुक्यातील सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित ३१८ रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक १०५ रुग्ण अमळनेर तालुक्यातील आहे. तर त्या खालोखाल जळगाव शहर ६७, भुसावळ शहर ६२ रुग्ण आहे. असे असले तरी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्येही सर्वाधिक ७८ रुग्ण अमळनेरचे, भुसावळचे ९, जळगावचे ८, पाचोरा येथील १३ तर चोपडा व बाहेरील जिल्ह्यातील एका रुग्णांचा समावेश आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये एक वर्षाच्या बालकापासून ते ७० वर्षाच्या महिलेचा समावेश आहे.

हे घेत आहेत परिश्रम
वैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ़किरण पाटील, डॉ. गायकवाड व त्यांची टीम तर कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना आवश्यक त्या सुविधा व उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी अहोरात्र मेहनत घेत असून त्यांना लोकप्रतिनिधींचेही चांगले सहकार्य लाभत आहे.

मंगळवारी ३३ रुग्ण कोरोणामुक्त होऊन घरी परतले
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे, जि़प़सीईओ डॉ़ बी़एऩ पाटील, पोलीस अधीक्षक डॉ़पंजाबराव उगले, मनपा आयुक्त सुतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़दिलीप पाटोडे व आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून एकाच दिवशी जिल्ह्यातील ३३ रुग्ण कोरोणामुक्त होऊन घरी परतले आहे.

सात दिवस होम क्वांरटाईन
दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींना आरोग्य विभागाच्या निगराणीखाली सात दिवस होम क्वांरटाईन ठेवण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. खैरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली आहे. असे असले तरी नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लॉकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित राहावे, अनावश्यक गर्दी टाळावी, सुरक्षित अंतर राखावे, मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करावा. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले आहे.

Web Title: Centuries of corona-free patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.