सीईओंनी फाइल मागताच आरोग्य विभागात धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:17 AM2021-09-19T04:17:59+5:302021-09-19T04:17:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यावल तालुक्यातील आसराबारी येथे कुपोषणाने ८ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची अहवालांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यावल तालुक्यातील आसराबारी येथे कुपोषणाने ८ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची अहवालांची फाइल गेल्या अनेक दिवसांपासून जि.प.आरोग्य विभागातच अडकली आहे. शनिवारी सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी तातडीने ही फाइल मागताच आरोग्य विभागातच एकच धावपळ उडाली होती. यातील एक फाइल काही दिवसांपूर्वी सामान्य प्रशासनाकडे देण्यात आल्याची माहिती समोर आली.
आसराबारी येथील बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाल्यानंतर या पाड्यावर कुठल्याच यंत्रणा पोहोचल्या नसल्याचे वास्तव समोर आले होत. यासह जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेलाही कुठलेही पोषण नसल्याने अंगात रक्त कमी असल्याने तिची प्रकृती अत्यंत गंभीर झालेली होती व त्यांना कुठलाच आहार किंवा त्यांची नोंदणी नसल्याची गंभीर बाब समोर आली होती. या दोन प्रकरणात कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी दिल्या होत्या. यात आसराबारीच्या प्रकरणात ७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यांचे खुलासे प्राप्त झाले होते.
फाइल पडून
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर ही फाइल आरोग्य विभागातच पडून आहे. ती सीईओंकडे अद्यापही सोपविण्यात आलेली नव्हती. यात या अधिकाऱ्यांचे खुलासे हे मान्य करावे की नाही, याचा अधिकार हा सीईओंना असल्याने शनिवारी अखेर त्यांनी या फाइल मागितल्या. हा निरोप घेऊन महिला व बालकल्याण विभागातील एक अधिकारी आरोग्य विभागात आल्यानंतर मग एकमेकांना फोन लावून नेमक्या फाइल आहेत कुठे, याची माहिती घेण्यास सुरुवात झाली. यातील एक फाइल ही ९ सप्टेंबरपासून सामान्य प्रशासन विभागात दिल्याचे समोर आले. त्यामुळे संथ कारभाराचा एक नमुना या प्रकरणातून समोर आला आहे. आता सीईओ यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.