सुटकारच्या शिक्षकाला भोवला वर्गातील राजेशाही थाट, सीईओंनी केले निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:17 PM2019-07-03T12:17:57+5:302019-07-03T12:20:56+5:30
बेशीस्त वर्तणूक व्हायरल
जळगाव : शिस्तीचे धडे देणाऱ्या जि.प. शाळेतील गुरूजींचाच बेंचवर पाय ठेवून मोबाईल बघण््याच्या बेशिस्त वर्तणुकीचा व्हिडिओ समोर आला असून या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़ सुटकार ता़चोपडा येथील साहेबराव पाटील असे या शिक्षकाचे नाव आहे़
साहेबराव गुलाबराव पाटील हे सुटकार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत़ २६ जुन रोजी दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांना शिकविणे सोडून साहेबरावांनी काही विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर पाठवून दिले, काही विद्यार्थी शाळेत उपस्थित असताना या विद्यार्थ्यांसमोर बेंचवर दोन्ही पाय ठेवून मोबाईल बघत बसले होते़ ग्रामस्थांनी शिक्षकाला विचारणा केल्यानंतर उलट या शिक्षकानेच ग्रामस्थांना उत्तरे न देता शाळेतून हाकलून लावले होते़ ग्रामस्थांनी मुख्याध्यापकांनाही याबाबत विचारणा केली मात्र, त्यांनीही उद्धटपणे उत्तरे दिल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे़ ग्रामस्थांनी शिक्षकाच्या बेशिस्त वर्तणुकीचा व्हीडीओ करून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोशल मिडियाच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतर त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यांच्या आदेशावरून गटविकास अधिकारी कोसोदे यांनी गटशिक्षणाधिकाºयांना शाळेवर चौकशीसाठी पाठविले़ गटशिक्षणाधिकारी डॉ़ भावना भोसले यांनी २८ जून रोजी शाळेत पाहणी केली़ या चौकशीचा अहवाल त्यांनी गटविकास अधिकारी कोसोदे यांच्याकडे सादर केला़ या अहवालानुसार उपशिक्षक पाटील यांचे वर्तन गैरशिस्तीचे व कर्तव्यात कसूर करीत असल्याचे सिद्ध होत असल्याने साहेबराव पाटील यांना उपशिक्षक या पदावरून निलंबित करीत असल्याचे आदेशात म्हटले आहे़ निलंबनानंतर त्यांचे मुख्यालय चोपडा पं. स. असेल.
सोशल मीडियामुळे प्रकार उघडकीस
एका गृहस्थ त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी शाळेत आलेले होते़ त्यावेळी हा प्रकार त्यांना निदर्शनास आला़ त्यांनी याचा व्हिडिओ तयार केला़ शिक्षकांना विचारणा केली मात्र, शिक्षकांनी त्यांना हाकलून लावले़ शिक्षकांना धडा शिकविण्यासाठी त्या गृहस्थांनी हा व्हिडिओ गावाच्या एका गृपवर २६ जून रोजीच व्हायरल केला होता़ त्यानंतर रात्रीच हा व्हिडिओ सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांच्याकडे पोहचला़ त्यांनी तत्काळ गटविकास अधिकाºयांना यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले़ त्यानंतर दोन दिवसांनी तत्काळ सूत्रे हलली़ दरम्यान, २७ रोजी आधी शिक्षक पाटील यांना नोटीस बजावण्यात आली़ होती व त्यानंतर गटशिक्षणाधिकाºयांनी त्यांचा लेखी खुलासा शाळेतच घेतला़ यात आपले वय ५१ आहे़ कंटाळा आला होता, पाय दुखत होते म्हणून अनावधानाने आपण बेंचवर पाय ठेवले होते, असा खुलासा या शिक्षकांनी दिला आहे़ सुटकारच्या शाळेत एक ते चौथीपर्यंंत ९५ विद्यार्थी असून दुसरीच्या वर्गात हा प्रकार घडला़