प्रमाणपत्र मिळेना ! पालकांची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:15 AM2021-01-17T04:15:15+5:302021-01-17T04:15:15+5:30
सलग दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचा पाच तास गोंधळ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पाच ते सहा महिन्यांपासून अर्ज करूनसुध्दा जात ...
सलग दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचा पाच तास गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पाच ते सहा महिन्यांपासून अर्ज करूनसुध्दा जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीसुध्दा प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांनी पाच तास जात पडताळणी कार्यालयात गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. या गोंधळात पोलीस, विद्यार्थी आमने-सामने आले होते. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सायंकाळी हा गोंधळ शांत होऊन बहुतांश विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. उच्चशिक्षणात शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यक असते. त्यासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी कार्यालयात ऑनलाईन अर्ज करून त्याची हार्डकॉपी सादर करावी लागते. गेल्या काही महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील एमबीए व अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणीसाठी अर्ज केला होता. मात्र, अनेकवेळा चकरा मारूनसुध्दा प्रमाणपत्र मिळत नव्हते. त्यामुळे शुक्रवारी विद्यार्थ्यांनी जात पडताळणी कार्यालयात गोंधळ घातला होता. तरीसुध्दा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळपासून विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालय गाठले होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांना कार्यालयाच्या आवारात प्रवेश दिला जात नव्हता. मात्र, गोंधळानंतर प्रवेश देण्यात आला.
तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी
वारंवार चकरा मारूनसुध्दा प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकसुध्दा जात पडताळणी कार्यालयात आले होते. मात्र, काही वेळ उलटूनही प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे एका महिलेने चक्क तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्यासाठी धाव घेतली. मात्र, तिची समजूत घालण्यात आली. दुसरीकडे प्रमाणपत्र न मिळाल्यास येथून खाली उडी मारेल अशी धमकी दिली जात होती. शेवटी गोंधळ वाढल्यामुळे जात पडताळणी कार्यालयात पोलीस व होमगार्ड दाखल झाले.
कर्मचाऱ्यांनी केले काम बंद
गेल्या दोन ते तीन तासांपासून गोंधळ सुरू असल्यामुळे जात पडताळणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कंटाळून थेट उठून काम बंदचा पवित्रा घेतला. यामुळे चांगलाच गोंधळ झाला. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांना कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. त्यामुळे काही वेळ गोंधळ शांत झाला होता.
महिला पोलीस व विद्यार्थिनींत वाद
प्रचंड गाेंधळामुळे पडताळणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंदचा पवित्रा घेतला. त्यामुळे पोलीस विद्यार्थ्यांना कार्यालयाबाहेर काढीत होते. त्यावेळी एका विद्यार्थिनी व महिला पोलिसाचा जोरदार शाब्दीक वाद झाला. त्यानंतर बाहेर रांग लागल्यानंतरदेखील विद्यार्थी व पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विद्यार्थ्यांना मिळाले प्रमाणपत्र
विद्यार्थ्यांसह पालकांनी प्रचंड गोंधळ घातल्यामुळे रामानंदनगर पोलिसांचा ताफा जात पडताळणी कार्यालय आवारात दाखल झाला होता. गोंधळ कमी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना त्रुटी आहेत. त्यांना त्रुटी सांगण्यात आल्या तर बहुतांश विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेल आयडीवर प्रमाणपत्र पाठविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. कुणाल पवार हेसुध्दा जात पडताळणी कार्यालयात दाखल झाले होते.
२० तारखेपर्यंत मुदतवाढ
शनिवारी दुपारी विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू असताना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे मुदतवाढीचे पत्र धडकले. पत्रानुसार विद्यार्थ्यांना २० तारखेपर्यंत प्रमाणपत्र महाविद्यालयात सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी प्रमाणपत्राकरिता अर्ज केल्याची पावती ऑनलाइन अर्ज करताना सादर केलेली आहे. अशाच उमेदवारांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
आणखी मुतदवाढ द्या
जात प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांच्या त्रुटी आढळून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्यााची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.