धानोरा येथून प्रौढेच्या गळ्यातून मंगळसूत्र पळविणा:या महिलेस सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 09:11 PM2017-12-04T21:11:52+5:302017-12-04T21:15:47+5:30
धानोरा येथे आठवडे बाजारात महिलेचे मंगळसूत्र पळविल्याप्रकरणी दाखल गुन्हय़ाचा खटला चोपडा न्यायालयात चालून विक्रमी वेळेत जलदगती निर्णय देण्यात आला. अवघ्या पाच दिवसात खटल्याचे कामकाज आटोपले.
ऑनलाईन लोकमत चोपडा, दि. 4 : तालुक्यातील धानोरा येथे बाजारात एका महिलेचे वीस हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र पळविणा:या 40 वर्षीय महिलेस 3 वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड तसेच नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीस 5 हजार रुपये देण्याची शिक्षा येथील न्यायालयाने सोमवारी ठोठावली. विशेष म्हणजे सदर प्रकरणात 11 दिवसात पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल झाले, आणि न्यायालयात फक्त पाच दिवसात खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन विक्रमी जलदगतीने निर्णय लागला आहे. 23 नोव्हेंबर रोजी धानोरा येथील आठवडे बाजारात संध्याकाळी लिलाबाई महाजन (वय 50) या व त्यांची सून नंदा महाजन बाजार करीत असतांना गर्दीचा फायदा घेऊन 3 पैकी एका महिलेने लिलाबाई यांच्या मानेवर पाठीमागून जोरात थाप मारून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. तेंव्हा नंदा महाजन यांनी सदर महिलेचा पाठलाग करून तिला पकडले. परंतु इतर दोन्ही महिला गर्दीचा फायदा घेऊन पळून गेल्या. त्याचवेळी धानो:याचे पोलीस पाटील दिनेश पाटील हे सुद्धा बाजारातच होते. त्यांनी जमलेल्या महिलांसमक्ष सदर महिलेस नाव गाव, बाजारात येण्याचे कारण, पळविलेले मंगळसूत्र, याबाबत विचारपूस केली. परंतु सदर महिला तिचे नाव सुनिताबाई देवा वाघ रा. बारडोली (गुजरात) असा अपूर्ण पत्ता सांगून गुन्हा कबुल करत नसल्याने तिला सर्वानी त्याच सायंकाळी अडावद पोलीस स्टेशनला आणले आणि तेथे नंदा महाजन यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक कांचन काळे यांनी सदर महिलेची दोन महिला पंचासमक्ष अंगझडती घेतली व पळविलेले मंगळसूत्र हस्तगत केले आणि तिला रात्री 11 वाजता अटक केली. याप्रकरणी सपोनि जयपाल हिरे यांनी स्वत: गुन्ह्याचा जलद गतीने तपास करत अवघ्या 5 दिवसात 28 रोजी चोपडा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात सदर खटला जलदगतीने चालला आणि दोषी महिलेस 4 रोजी 3 वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीस 5,000 रुपये देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला असून दंड न भरल्यास 6 महीने अतिरीक्त कारावासाची शिक्षा फर्मावली आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे गजानन खिल्लारे यांनी कामकाज पाहिले. त्यांना हवालदार मोहन जावरे यांनी पैरवी अधिकारी म्हणून मदत केली. सदर खटल्याची सुनावणी फक्त 5 दिवसात पूर्ण करत प्रथम वर्ग न्यायाधीश ग.दि. लांडबळे यांनी दोषी महिलेला शिक्षा सुनावली.