जळगावात समतानगरात पिता-पूत्रावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:16 PM2018-12-15T12:16:01+5:302018-12-15T12:16:25+5:30
शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने वार
जळगाव : महिलांसमोर अश्लील शिवीगाळ का करीत आहे, याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दिलीप सोनू सपकाळे (५०) व विक्की दिलीप सपकाळे (१७) या पिता-पूत्रावर चाकूने हल्ला केल्याने दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास समतानगरात घडली. यातील हल्ला करणारा विशाल (पूर्ण नाव समजू शकले नाही) नामक तरुण हल्ल्यानंतर पसार झाला.
या घटनेबाबत जखमींच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, समतानगरात दिलीप सपकाळे यांच्या घरासमोर विशाल नामक तरुण आला व त्याने अश्लील शिविगाळ करणे सुरू केले. त्या वेळी महिलादेखील समोर बसलेल्या होत्या. त्याप्रसंगी दिलीप सपकाळे यांनी विशालला महिलांसमोर अश्लिल शिविगाळ का करीत आहे, या बाबत विचारणा केली. त्यावेळी विशालने त्याच्याकडे असलेला चाकू काढून थेट दिलीप सपकाळे यांच्यावर हल्ला केला. त्या वेळी दिलीप सपकाळे यांचा मुलगा विक्की सपकाळे याने तेथे धाव घेतली. विशालने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दिलीप सपकाळे यांच्या पोटाच्या दोन्ही बाजूला व छातीजवळ एक अशा तीन जखमा झाल्या तर विक्कीच्या छातीजवळ एक जखम झाली आहे.
घटनेनंतर दोघांनाही तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. उदय कुरकुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार केले.
तरुण पसार
घटना घडल्यानंतर हल्लेखोर तरुणाने तेथून पळ काढला. या तरुणाचे पूर्ण नाव देखील जखमींना समजू शकले नाही. तसेच हा तरुण का शिवीगाळ करीत होता याचेही कारण समजू शकले नाही. दिलीप सपकाळे हे रोजंदारीने काम करतात तर विक्की हा इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश
जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविल्यानंतर तेथे जखमींच्या कुटुंबीयांना धाव घेतली. या ठिकाणी जखमींच्या चिंतेने नातेवाईकांनी आक्रोश केला. या ठिकाणी जखमींच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.