माजी महापौरांच्या नातेवाईकांवर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:47 PM2019-01-05T12:47:58+5:302019-01-05T12:48:19+5:30
तीन जण जखमी : जळगावातील भोईटे गढीजवळील घटना, आरोपी फरार
जळगाव : आईसक्रीम घेण्यासाठी जात असलेल्या तीन तरुणांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना जुने जळगावात गुरुवारी रात्री १०.१५ ते १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात पळापळ सुरू झाली होती. काही वेळातच शनिपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले होते. हे तीनही जण माजी महापौर ललित कोल्हे यांचे नातेवाईक आहेत.
चेतन युवराज कोल्हे, युवराज यशवंत कोल्हे, सुजय एकनाथ कोल्हे (रा. कोल्हेवाडा, जुने जळगाव) अशी या जखमींची नावे आहेत.
शहरातील रामपेठ कोल्हेवाडा येथील सौरभ प्रशांत कोल्हे याने गुरुवारी रात्री १०.१५ ते १०.३० वाजेच्या सुमारास चेतन, युवराज व सुजय कोल्हे यांना आईसक्रीम घेण्यासाठी पाठविले. त्यासाठी तिघे जण हेमराज कोल्हे याची दुचाकी घेवून आईसक्रीम घेण्यासाठी गेले. कुत्रे मागे लागतात म्हणून त्यांनी हातात प्लास्टिकचा पाईप घेतला होता.
चाकु, लोखंडी पट्टीने केले वार
त्याचवेळी भोईटे गढीजवळ आकाश उर्फ धडकन सुरेश कोळी, सागर उर्फ झंप्प्या आनंदा कोळी व विशाल बुनकर हे रस्त्यावर उभे होते. त्यांनी चेतनला हातात काठी घेवून फिरताहेत, तुम्ही दादा झाले ? का म्हटले. त्यावर चेतनने कुत्र्याच्या भितीने नळी घेतल्याचे सांगितल्यावरही आकाशने चेतनला लोखंडी पट्टी मारली तर विशाल बुनकर याने चेतनची पाठ व मनगटावर दगड मारुन जखमी केले. हा प्रकार पाहून भांडण सोडविण्यासाठी चेतनच्या सोबत असलेले युवराज व सुजय गेले असता त्यांना सागर उर्फ झंप्प्या कोळी याने दोघांना चाकू मारला.
या प्रकरणात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी फरार असल्याचे शनिपेठ पोलिसांनी सांगितले.
परिसरात दहशत : अचानक झालेल्या प्रकाराने परिसरात एकच पळापळ सुरू झाली. काही जणांनी तात्काळ शनिपेठ पोलिस स्टेशनला घटनेची माहिती कळविली. काही वेळातच शनिपेठ पोलीस या ठिकाणी दाखल झाले. तोपर्यंत जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सौरभ प्रशांत कोल्हे रा. रामपेठ कोळीवाड याच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिसात आकाश उर्फ धडकन सुरेश कोळी, सागर उर्फ झंप्प्या आनंदा कोळी व विशाल बुनकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे हे स्वत: करीत आहेत. पोलीस निरिक्षकांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ तसेच सामान्य रूग्णालयातही जाऊन हल्ल्याच्या घटनेची माहिती घेतली.
आरोपींवर कारवाईची मागणी : हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी माजी महापौर ललीत कोल्हे यांनाा घटनेची माहिती कळविली. कोल्हे यांनी गुरुवारी दुपारी पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांची भेट घेतली व संशयितांना तत्काळ अटक करुन कारवाईची मागणी केली.