यु.एस.ओपनवर चालेल मारियाची ‘ब्लॅक मॅजिक'?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 04:45 PM2017-08-24T16:45:20+5:302017-08-24T18:36:31+5:30

यु.एस.ओपन स्पर्धेसाठी मारिया शारापोव्हा हिने खास डिझाईन केलाय लेस व क्रिस्टल्सचा नक्षीदार काळा ड्रेस

Chalal Maria's 'Black Magic' on US Open? | यु.एस.ओपनवर चालेल मारियाची ‘ब्लॅक मॅजिक'?

यु.एस.ओपनवर चालेल मारियाची ‘ब्लॅक मॅजिक'?

googlenewsNext

ललित झांबरे / आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. २४ - देखणी स्टार टेनिसपटू मारिया शारापोव्हा येत्या सोमवारपासून सुरु होत असलेल्या यु.एस.ओपनमध्ये एका आगळ्यावेगळ्या झगमगत्या पोशाखात खेळताना दिसेल. हा पोशाख चर्चेचा विषय ठरण्याचे कारण म्हणजे त्यांचे रंग आणि त्याची डिझाईन.
सहसा टेनीस म्हटले की पांढरा किंवा हलक्या-मंद रंगांचेच पोशाख डोळ्यासमोर येतात, पण मारियाचा हा ड्रेस असेल टेनीससाठी जवळपास निषिद्ध  समजल्या जाणाºया काळ्या रंगाचा!
एवढंच नाही तर त्यात असेल लेस आणि एम्ब्रॉयडरी केलेल्या छिद्रांची आकर्षक नक्षी. आणि त्याला 'चार चांद' लावत सौदर्यात आणखी भर घालतील स्वारोवस्कीचे चमचमते क्रिस्टल्स (स्फटिक). आणि हा पोशाख ती वापरणार आहे रात्रीच्या सामन्यांसाठी! 
आता विचार करा की, लाखो दिलांची धडकन असलेली ही उंचपुरी, देखणी तारका रात्री दिव्यांच्या प्रकाशझोतात क्रिस्टल्सनी चमचमत्या काळ्या रंगाच्या पोशाखात आर्थर अ‍ॅश स्टेडियमच्या कोर्टवर उतरेल तो नजारा काय असेल? 

आता हा प्रश्न पडला असेल की काळा रंगच का? तर २००६ मध्ये मारियाने यु.एस. ओपन जिंकली होती, तेव्हा तिने काळ्या रंगाचाच पोशाख वापरला होता. म्हणजे काळा रंग आपल्यासाठी शुभ आहे असे ती मानते. आणि आता तर डोपींग बॅनमधून बाहेर आल्यावर वाईल्ड कार्डद्वारे मेन ड्रॉमध्ये स्थान मिळाल्यावर भरपूर जणांचा रोष ओढवून घेतल्यावर तिला शुभशकुनांची गरज आहेच. 

एखाद्या खेळाडूच्या पोशाखावर लेस आणि क्रिस्टल्स असं भन्नाट कॉम्बिनेशन असण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. नाईकी ब्रँडसाठी डिझायनर रिकार्डो टिस्कीने हा ड्रेस डिझाईन केला आहे. मैदानात उतरताना प्रसिध्द हॉलिवूड तारका आॅड्री हेपबर्नसारखीच मारियासुध्दा सुंदर भासावी असा हा पोशाख असल्याचे टिस्की म्हणतो. चाहत्यांसाठी २६ आॅगस्टपासून नाईकीच्या स्टोअर्समध्येही हा ड्रेस उपलब्ध होणार आहे. परंतु ५०० डॉलर एवढी त्याची महागडी किंमत असणार आहे.

Web Title: Chalal Maria's 'Black Magic' on US Open?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.