चाळीसगावला वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:13 AM2019-02-14T00:13:14+5:302019-02-14T00:13:33+5:30
मालक व चालकाविरुद्ध गुन्हा
चाळीसगाव : महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे पकडलेले सात ट्रॅक्टर जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच चाळीसगाव येथील पोलीस कवायत मैदानातून वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती अशी की, २५ जानेवारी २०१९ रोजी अवैध गौणखनिज पथकातील तलाठी पी.एम. महाजन व तलाठी दिनेश यडे यांनी टाकळी प्र.चा. येथे हसतखेळत या हॉटेलसमोर रात्री साडेआठच्या सुमारास वाळूने भरलेले ट्रॅक्टर टाकळी प्र.चा.कडून चाळीसगावकडे येत असताना पकडले. पथक ट्रॅक्टर चालकाची विचारपूस करीत असताना चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला. पथकाने पाठलाग करूनही चालक सापडला नाही. त्यामुळे जप्त केलेले विना क्रमांकाचे वाळूचे ट्रॅक्टर व ट्रॉली व त्यातील एक ब्रास वाळू पोलीस कवायत मैदानावर आणले.
मात्र हे ट्रॅक्टर १३ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास महसूल विभागाचे कर्मचारी भागवत आनंदा चव्हाण हे पाहण्यासाठी गेले असता सदर ट्रॅक्टर जागेवर आढळून आले नाही. हे ट्रॅक्टर १२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पोलीस कवायत मैदानावर होते. मात्र १३ रोजी सकाळी वाळूने भरलेले ट्रॅक्टर गायब झाल्याचे आढळून आले. हे ट्रॅक्टर व ट्राली पळवून नेल्याप्रकरणी ट्रॅक्टरचालक (नाव गाव समजू शकले नाही) व मालक नितीन महाजन यांच्याविरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपासून तालुक्यात वाळू चोरीचे प्रकरण चांगलेच गाजत असताना आता चक्क पोलीस कवायत मैदानातून वाळू चोरीप्रकरणी पकडण्यात आलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.