चाळीसगावला पहिली ते आठवीचे ६९ हजार विद्यार्थी झाले पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 06:40 PM2021-04-03T18:40:18+5:302021-04-03T18:42:41+5:30
शासन निर्णयामुळे चाळीसगावला पहिली ते आठवीचे ६९ हजार विद्यार्थी झाले आहेत.
चाळीसगाव : राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट सुसाट असून गेल्या वर्षभरापासून बंद असणाऱ्या शाळांची टाळेबंदी अनलाॕक होण्याची चिन्हे दिसत नसल्याने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेताच वरच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शनिवारी शिक्षण विभागाने घेतला आहे. चाळीसगाव तालुक्यातील ६९ हजार ७३४ विद्यार्थी यामुळे वरच्या वर्गात जाणार असून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे ? या परीक्षेतून शिक्षकांचीही सुटका होणार आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आणि ऑनलाइन शिक्षणासाठी पुरेशा प्रमाणात साधनांची उपलब्धता नसल्याने, विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी आल्या. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात या अडचणी अधिक होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने, त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
इयत्ता पहिली ते आठवीचा निकाल सर्वंकष मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केला जातो. मात्र, यंदा जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, महापालिका अशा सरकारी शाळांमध्ये दोन चाचण्या आणि दोन संकलित मूल्यमापन योग्य पद्धतीने होऊ शकले नाही. ही समस्या शिक्षकांनी अधोरेखित केली होती. वर्षभर शाळांना टाळेच आहे. शहरी भागातील काही अनुदानित शाळांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या असून, निकाल तयार केला आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष संपत असून, आता गुणपत्रके तयार करून निकाल जाहीर करण्याची वेळ आली असतांना त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबण्यात यावी, याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन सूचना मिळाल्या नव्हत्या. यामुळे शिक्षकांसह पालक व विद्यार्थ्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय जाहीर केल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
६९ हजार ७३५ विद्यार्थी पास
चाळीसगाव तालुक्यात पहिली ते पाचवी इयत्तेतील ४३ हजार ८५६ तर सहावी ते आठवीपर्यंतचे २५ हजार ८७९ अशा एकूण ६९ हजार ७३४ विद्यार्थ्यांच्या शाळेची वाट गेल्या वर्षभरापासून रोखून धरली आहे. गेल्यावर्षी २२ मार्चपासून सार्वजनिक टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर शाळांनाही कुलूपे लागली. शालेय विभागाने शनिवारी घेतलेल्या निर्णयामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.
ऑनलाईन शिक्षणात अडचणींचा व्यत्यय अधिक
टाळेबंदीमुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आला. मात्र इंटरनेटच्या समस्येसोबतच बहुतांशी पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाही. ग्रामीण भागात ही समस्या ऐरणीवर आली. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा थोड्याच अवधीत समोर आल्या. फेब्रुवारीत शाळा सुरू होण्याच्या स्थिती असतांनाच कोरोनाची दुसरी लाट आली. यामुळे शाळांच्या घंटा पुन्हा वाजणे शक्य नव्हते. विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला असला तरी शाळा कधी उघडणार? हा प्रश्न मात्र कायम आहे.
योग्य निर्णय
कोरोनाचा कहर पाहता शाळा सुरू होणे शक्य नव्हते. गेल्या काही महिन्यापासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे? याविषयी वेगवेगळे मतप्रवाह होते. तथापि, शिक्षण विभागाने परीक्षेविनाच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे.
- लक्ष्मण धाकलू चव्हाण
मुख्याध्यापक, जि.प.उच्च प्राथमिक शाळा शिंदी, ता.चाळीसगाव
पालकांमध्ये मोठी भीती
कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याविषयी पालकांमध्ये मोठी भीती आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमाची आम्ही प्रभावी अंमलबजावणी केली. मात्र इंटरनेट व स्मार्ट फोन ही समस्याही आहेच. विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच प्रमोट करणे हा निर्णय योग्य म्हणता येईल.
- राजेंद्र भाऊराव, शिक्षक, जि.प.उच्च प्राथमिक शाळा, शिंदी, ता.चाळीसगाव
शाळा लवकर सुरू व्हाव्यात
आमचे ऑनलाईन परीक्षा पेपर सुरू होते. आता परीक्षेशिवाय वरच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. कोरोनाकाळात हे योग्यच म्हणता येईल. मात्र शाळाही लवकर सुरू झाल्या पाहिजेत, असे मनापासून वाटते. ऑनलाईन शिक्षणात खूपच अडचणी येत आहे.
- आदित्य शरद कोळी, विद्यार्थी, इयत्ता आठवी, गुडशेफर्ड विद्यालय, चाळीसगाव.