चाळीसगाव बाजार समितीने धरली आधुनिकतेची कास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 11:26 PM2021-04-03T23:26:44+5:302021-04-03T23:29:37+5:30
चाळीसगाव बाजार समितीने आधुनिकतेची कास धरली आहे.
चाळीसगाव : येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना बाजार समितीबद्दल संपूर्ण माहिती मिळण्यासाठी 'माय एपीएमसी, माझी बाजार समिती' या ॲपचे लोकार्पण शनिवारी करण्यात आले. यावेळी नूतन प्रशासक मंडळ उपस्थित होते बाजारभाव, शेतकरी नोंदणी, बाजारसमिती माहिती, सुट्ट्या, व्यापारी यादी, हवामान अंदाज, बातम्या व उपक्रम, फोटो गॅलरी, हमीभाव यादी, संचालक मंडळ सूची व संपर्क या साऱ्या बाबींचा या एपमध्ये उल्लेख राहणार असून, या ॲपचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
कोरोना काळात शेतकऱ्यांना बाजार समितीत नोंदणी करण्यास येण्याची गरज नाही. तसेच व्यापारी यादीमुळे नोंदणीकृत व्यापाऱ्यांची माहिती मिळणार आहे. बाजार समितीने राबविलेले सर्व उपक्रम, फोटो गॅलरीद्वारे माहिती पडणार आहे. तसेच हवामान अंदाजामुळे रोजचे तापमान व दुसऱ्या दिवसाचा वातावरणातील बदल याची पूर्वसूचना ॲपद्वारे मिळणार आहे. या अशा अनेक बाबींमुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. आधुनिकतेत भर पडणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी यावेळी केले.
बाजार समितीच्या नूतन प्रशासकांनी अल्पावधीत शेतकऱ्यांच्या हितावह निर्णय घेतले असून राबविण्यात येणार सर्व उपक्रम स्तुत्य राहिले आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ मार्गदर्शक प्रदीप देशमुख यांनी केले.
याप्रसंगी बाजार समितीचे सचिव सतीशराजे पाटील, प्रशासक ईश्वर ठाकरे, अनिल निकम, महेंद्र पाटील, भास्कर पवार, भीमराव खलाने, गोकुळ कोल्हे, नेताजी वाघ, नकुल पाटील, तुकाराम पाटील, दगडू दणके, धर्मा काळे, रमेश सोनागिरे, बापूराव चौधरी, मधुकर कडवे, स्वप्नील कोतकर कर्मचारी वीरेंद्र पवार, प्रवीण वाघ, ज्ञानेश्वर गायके, प्रशांत मगर आदी उपस्थित होते.