चाळीसगाव ठरतेय ‘कोरोनाचा हॉट स्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:35+5:302021-06-09T04:20:35+5:30
चाळीसगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना चाळीसगाव शहर व तालुका परिसरात मात्र बाधितांचा उद्रेक झाला आहे. ...
चाळीसगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना चाळीसगाव शहर व तालुका परिसरात मात्र बाधितांचा उद्रेक झाला आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांची ही उसळी चिंताजनक असून यामुळे चाळीसगावची वाटचाल ‘कोरोनाच्या हॉट स्पॉट’कडे होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रशासनाच्या टीमने रविवारपासून ग्रामीण भागात दौरे सुरू केले आहेत. बाधितांची संख्या सारखी फुगत असल्याने प्रशासनासह आरोग्य विभागालाही दुसरी लाट थोपविण्यात अपयश आल्याचे उघडपणे बोलले जात आहे.
गेल्या महिन्यात येथील कोरोना रुग्णांचे कार्ड निरंक होत होते. मात्र गत १५ दिवसात कोरोनाबाधित रुग्ण परिसरात आढळून येत आहेत. यामुळे बाधितांची संख्या लवकरच दहाहजारी होणार आहे. सद्यस्थितीत ही संख्या नऊ हजाराहून अधिक आहे. तसेच १२१ रुग्णांचा बळी कोरोनाने घेतला आहे. बाधितांची संख्या सारखी वाढत असल्याने प्रशासनावर सर्वसामान्यांची टीका होऊ लागली आहे. ५२८ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याने नागरिकांनीदेखील खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्क नियमितपणे वापरावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
ऊसतोड मजुरांची तपासणी होणे आवश्यक
चाळीसगाव तालुक्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र व दक्षिणेकडील राज्यांतही ऊसतोडीसाठी जातात. ही संख्या ४० हजाराहून अधिक आहे. गेल्यावर्षी कारखान्यांच्या स्थळावर मजुरांची कोरोना तपासणी करून त्यांना तसे प्रमाणपत्र देऊन गावी सोडण्यात आले होते.
१... यावर्षी मात्र गेल्या महिन्यात मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर गावी परतले असून त्यांची तपासणी केलेली नाही. यामुळेच नव्याने आढळणाऱ्या बाधितांमध्ये याच मजुरांची संख्या अधिक आहे.
.............
चौकट
खेर्डे व हातले तांड्यात आढळले बाधित
रविवारी खेर्डे व हातले तांडा येथे अनुक्रमे १६ व १५ कोरोनाबाधित झालेले ऊसतोड मजूर आढळून आले आहेत. मंगळवारी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे यांच्या टीमने खेर्डे, हातले, गोरखपूर, ओढरे येथील ऊसतोड मजुरांच्या तांड्यांमध्ये जाऊन आढावा घेतला. ऊसतोडीहून परतलेल्या मजुरांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. रविवारी एकाच दिवशी ९७ बाधित रुग्ण आढळून आल्याने ऊसतोडीहून परतलेल्या मजुरांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी सर्वत्र होऊ लागली आहे. रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक संख्या ऊसतोड मजुरांची आहे. त्यांच्यावर कोरोना उपचार केंद्रात उपचार सुरू करण्यात आले असून प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रही घोषित केले आहे.
............
चौकट
जनता टाळेबंदीनंतर गर्दीच गर्दी
जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाने शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश दिले होते. सोमवारी निर्बंध शिथिल होताच गर्दीही अनलॉक झाली. मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न पाळणे, असे कोरोनाला निमंत्रण देणारे चित्र शहरात सोमवारी व मंगळवारी सर्वत्र दिसून आले. गर्दीला कुठेही ब्रेक लागल्याचे दिसून आले नाही.
..........
इन फो
कोरोनाचे रौद्ररूप हे प्रशासनाचे सपशेल अपयश आहे. बाहेरगावहून येणाऱ्या ऊसतोड मजुरांबाबत प्रशासनाने सतर्कता बाळगणे गरजेचे होते. मात्र तसे झाल्याचे दिसत नाही. प्रशासन व आरोग्य टीमने यापूर्वीच ग्रामीण भागात दौरे करायला हवे होते. बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येकाची तपासणी करावी, वाढते संक्रमण रोखावे, अशी आमची मागणी आहे.
- अनिल निकम
तालुकाध्यक्ष काँग्रेस, चाळीसगाव.
...........
इन्फो
मध्यंतरी वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठीच शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. जिथे जास्त बाधित आढळले, तिथे सोमवारी व मंगळवारी भेटी देऊन आढावा घेतला. प्रतिबंधित क्षेत्रही घोषित केले आहे. बाधितांमध्ये ऊसतोड मजुरांची संख्या जास्त आहे.
- अमोल मोरे
तहसीलदार, चाळीसगाव
.........
इन्फो
रविवारी खेर्डे व हातले तांडा येथे आढळून आलेल्या संक्रमित रुग्णांमध्ये ऊसतोड मजूरही आहेत. खेर्डे तांड्यात आढळलेले ऊसतोड मजूर नगर जिल्ह्यातून नुकतेच परतले आहेत. बाहेरगावहून आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. बाधितांवर उपचार सुरू केले आहेत.
- डॉ. देवराम लांडे
तालुका आरोग्य अधिकारी, चाळीसगाव.
कोरोना रुग्णांची भरमसाट वाढणारी संख्या चक्रावून टाकणारी आहे. प्रशासनाने गांभीर्य ओळखून काम करावे. बाहेरगावाहून आलेले नागरिक, ऊसतोड मजूर यांची तातडीने चाचणी करावी. हे मजूर गर्दीत मिसळले तर धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे.
- घृष्णेश्वर पाटील,
शहराध्यक्ष, भाजपा, चाळीसगाव.
===Photopath===
080621\08jal_1_08062021_12.jpg
===Caption===
चाळीसगावात मंगळवारी लोंजे येथे ऊसतोडीहून आलेल्या मजुरांसह बाहेरगावहून आलेल्यांची माहिती घेताना लक्ष्मीकांत साताळकर, डॉ. देवराम लांडे, अमोल मोरे व नंदकुमार वाळेकर आदी.