चाळीसगावला बामोशी बाबांच्या ऊरुसाला सुरुवात; तीनशे वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 10:03 PM2020-03-10T22:03:29+5:302020-03-10T22:03:46+5:30
शहराच्या दक्षिणेला पाटणादेवी रस्त्यालगत डोंगरी नदीच्या किनारी पीर मुसा कादरी बाबांचा दर्गाह असून येथेच गेल्या तीनशे वर्षापासून हिंदू - मुस्लिम ऐंक्याचे प्रतिक असणारा ऊरुस भरतो.
चाळीसगावः हिंदू - मुस्लिम ऐक्य व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असणारा चाळीसगाव येथील पीर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबांच्या ऊरुसाला सालाबादाप्रमाणे मंगळवारी संदल मिरवणुकीने सुरुवात झाली. सध्या कोरोना विषाणूचे सावट असल्याने प्रशासनातर्फे खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. ऊरुसासाठी देशभरातून येथे भाविक दाखल होतात. सायंकाळी साडेसातवाजता रथगल्लीतील सलीम शेख यांच्या घरुन परंपरेप्रमाणे संदल मिरवणूक निघाली. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
शहराच्या दक्षिणेला पाटणादेवी रस्त्यालगत डोंगरी नदीच्या किनारी पीर मुसा कादरी बाबांचा दर्गाह असून येथेच गेल्या तीनशे वर्षापासून हिंदू - मुस्लिम ऐंक्याचे प्रतिक असणारा ऊरुस भरतो. येथील जुन्या न.पा.कार्यालयाशेजारील डी.जी.देशमुख यांच्या वाड्यातून तलवारीची सवाद्य मिरवणूकही काढण्यात येते.
यंदा हा ऊरुस मंगळवार पासून सुरु झाला आहे. बुधवारी तलवारीची मिरवणूक सायंकाळी साडेपाच वाजता निघणार आहे. संसल मिरवणुकीच्यावेळी डीवायएसपी कैलास गावडे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.