चाळीसगाव बसस्थानक टाकणार कात
By Admin | Published: May 18, 2017 04:05 PM2017-05-18T16:05:30+5:302017-05-18T16:05:30+5:30
1 कोटी रुपयांचा निधी बसस्थानकासाठी मंजूर करण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 18 - चाळीसगाव बसस्थानकाची दुर्दशा लवकरच दूर होणार असून आवाराच्या कॉंक्रीटीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून 1 कोटी रुपयांचा निधी बसस्थानकासाठी मंजूर करण्यात आला आहे.
तालुक्यातील जवळपास 140 लहान मोठय़ा खेडय़ांसह परिसरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी करण्यासाठी चाळीसगाव बसस्थानक महत्त्वाचे आहे. चाळीसगाव तालुका हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि औरंगाबाद, नाशिक, धुळे या जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने महामंडळाच्या बसेसची मोठय़ा प्रमाणावर वर्दळ सुरू असते.
असे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानकाची मोठी दुर्दशा झाली आहे. विशेषत: पावसाळ्यात पाणी साचून स्थानकाला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचादेखील मोठा प्रश्न निर्माण होतो. हे टाळण्यासाठी बसस्थानकाला 1 कोटीचा निधी मंजूर झाला असून चाळीसगाव बसस्थानकाच्या नुतनीकरण व कॉंक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन 19 मे रोजी सकाळी 10 वाजता बस स्थानक आवारात होत आहे.