चाळीसगावच्या तरुणीचा पतंगाच्या मांजाने गळा चिरुन पुण्यात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:54 PM2018-10-08T12:54:03+5:302018-10-08T12:55:39+5:30
दुर्देवी घटना
चाळीसगाव, जि. जळगाव : दुचाकीवरुन जात असताना पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने चाळीसगाव येथील डॉक्टर तरुणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी पुणे भोसरी मार्गावर नाशिक फाटा येथे घडली. मृत तरुणीवर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता चाळीसगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या बाबत अधिक माहिती अशी की, कल्याण निकम, पौर्णिमा निकम यांची कन्या डॉ. सोनाली निकम (वय २६, रा. पिंपळे सौदागर, मूळ राहणार चाळीसगाव, जि. जळगाव) या रविवारी सायंकाळी पुण्याहून भोसरीकडे आपल्या दुचाकीवरून येत होत्या. नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावरून जात असताना त्यांच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकला. दुचाकीचा वेग जास्त असल्याने या मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. त्यांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डॉ. सोनाली या चाळीसगाव येथील असून डॉक्टर म्हणून पुण्यात आपली सेवा बजावत होत्या. सोनाली यांची आई पौर्णिमा या टाकळी प्र.चा.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका तर वडील कल्याण निकम हे ग.स. बँकेतील निवृत्त कर्मचारी आहेत. सोनालीचे अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रात्री चाळीसगाव येथील त्यांच्या निवासस्थानी नातेवाईकांनी गर्दी केली होती. सोमवारी पहाटे सोनाली यांचा मृतदेह चाळीसगाव येथे आणण्यात आला. सकाळी साडे दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.