चाळीसगावला अतिवृष्टीने हाहाकार; कन्नड घाट ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:39+5:302021-09-02T04:34:39+5:30
चाळीसगाव : सतत ओढ देत हुलकावणी देणाऱ्या पावसाने मंगळवारी रात्री जोरदार बॅटिंग करीत चाळीसगाव परिसराला बेसुमार झोडपून काढले. २४ ...
चाळीसगाव : सतत ओढ देत हुलकावणी देणाऱ्या पावसाने मंगळवारी रात्री जोरदार बॅटिंग करीत चाळीसगाव परिसराला बेसुमार झोडपून काढले. २४ तासात ५४६ मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीमुळे बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर नदी काठालगतचा परिसर जलमय झाला. या दोन्ही नद्या दुथडी भरून वेगाने वाहत होत्या. शिवाजी घाटासह बामोशी दर्गाह परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले असून, ग्रामीण भागात पशुधनाची मोठी हानी झाली आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके वाहून गेली आहेत.
कन्नड घाटात दरड कोसळण्यासह भूस्खलन झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. धुळे येथील आपत्ती व्यवस्थापनाची ३० जणांची टीम बोलविण्यात आली. तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता पाऊस थांबल्याने मदतकार्याला वेग आला होता. सकाळी ६ वाजताच आमदार मंगेश चव्हाण हे प्रशासनाच्या टीमसह नागरिकांच्या मदतीला धावून गेले. वाकडी येथे कलाबाई सुरेश पवार (६०) या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर पिंपरखेड येथे आश्रमशाळेच्या मागील बाजूस बाल्डे नदीच्या पाण्यात एक मृतदेह वाहून आला.
गेल्या अनेक वर्षात प्रथमच अशी अतिवृष्टी झाल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.
कन्नड घाटासह पाटणादेवी परिसरात मंगळवारी मध्यरात्री अतिवृष्टी झाल्याने डोंगरी नदीला मोठा पूर आला. बाणगाव, कोदगाव, वलठाण ही धरणे भरल्याने बुधवारी वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणेसीम, मजरे, खेर्डे, मुंदखेडे खुर्द, बोरखेडा खुर्द, पातोंडा, ओझर, टाकळी प्र.चा. आदी गावांमध्ये पुराचा मोठा फटका बसला आहे.
या गावांमध्ये पशुधनाची मोठी हानी झाली असून, शेकडो जनावरे पुराच्या पुण्यात बुडून दगावली. गेल्या २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. याच परिसरात पुराचे पाणी शेतांमध्ये शिरले. यामुळे पिकांसह मातीही वाहून गेल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. कपाशी, मका, कडधान्ये पिकांनाही मोठा फटका बसला आहे. महसूल व कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहे.
शिवाजी घाट, बामोशी बाबा दर्गाह परिसर जलमय
डोंगरी नदीकाठालगत असणारा शिवाजी घाट परिसर व बामोशी बाबा दर्गाह परिसर पुराच्या पाण्यामुळे जलमय झाला होता. बामोशी बाबा दर्गाहसह समाधिस्थळीही पुराचे पाणी पोहोचल्याने येथे असलेल्या भाविक व दुकानदारांची मोठी तारांबळ उडाली. नदीकाठालगत बांधलेली जनावरे, झोपड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. पुराचे पाणी घाट रोडपर्यंत पोहोचले होते.
१...शिवाजीघाट जलमय
याच परिसरात तळेगावकडून येणारी तितूर व पाटणादेवीकडून येणाऱ्या तितूर नदीचा संगम होतो. यामुळे या परिसरात पाण्याचा वेग वाढतो. पाण्याची पातळीही वाढते. बुधवारी हीच परिस्थिती येथे ओढावली. नव्या पुलावरील सर्व दुकानांमध्ये आठ ते दहा फुटांपर्यंत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्याचा वेग मोठा असल्याने हे पाणी मुख्य बाजारपेठेतही शिरले. स्टेशन रोडलगतच्या गल्ल्यांमध्येही आठ ते दहा फूट पाणी साचल्याने वाहने पाण्यात तरंगत होती. तितूर नदीच्या पुराचे पाणी तहसील कार्यालयाजवळील वीर सावरकर चौकापर्यंत, तर घाट रोडवरील डॉ. पूर्णपात्रे रुग्णालयापर्यंत पोहोचले होते. यामुळे नदीपलीकडील नागरिकांचा संपर्क तुटला. नगरपालिकेच्या जलतरण तलावानजीक असणाऱ्या घरांमध्येही पुराचे पाणी शिरल्याने वसंत मरसाळे व इतर नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले.
चौकट
कन्नड घाटात दरड कोसळली; ठिकठिकाणी झाले भूस्खलन
अतिवृष्टीने कन्नड घाटातील स्थिती सर्वाधिक भयावह झाली असून, आठ ते दहा ठिकाणी दरड कोसळून भूस्खलन झाल्याने रस्त्याला मोठेमोठे भगदाड पडले आहे. यामुळे येथील वाहतूक थांबविण्यात आली आहे. दरम्यान, येथे अनेक प्रवासी वाहने अडकून पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. धुळे येथील आपत्ती व्यवस्थापनाचे ३० जणांचे पथक व महामार्ग पोलिसांकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ता खचल्याने किमान महिनाभर तरी येथून वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता नाही.