चाळीसगाव येथे साडेआठ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:32 AM2019-08-01T00:32:13+5:302019-08-01T00:32:18+5:30
चाळीसगाव : येथे माजी सैनिकाच्या घरातून आठ लाख ७९ हजार २५० रुपये किमतीच्या संसारोपयोगी सामानासह फर्निचर व सोन्याचे दागिणे ...
चाळीसगाव : येथे माजी सैनिकाच्या घरातून आठ लाख ७९ हजार २५० रुपये किमतीच्या संसारोपयोगी सामानासह फर्निचर व सोन्याचे दागिणे चोरी गेल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घडली. याप्रकरणी टाकळी प्र.चा. येथील पाच जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
येथील माजी सैनिक सोनू महाजन यांच्या पत्नीने तीन महिन्यांपूर्वी पोलिसांना याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर तक्रारीची दखल घेत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. महाजन यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशावरुन ७ मे रोजी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड व त्यांच्या पथकाने ८ मे रोजी मुकुंदा कोठावदे यांच्या मालकीच्या व सोनू महाजन यांचे ताबेगहाण केलेल्या टाकळी प्र.चा.येथील घराचा पंचनामा केला. त्यावेळी महाजन यांच्या घरात संसारोपयोगी मिळून आले नव्हते. त्यामुळे त्यांची पत्नी मनीषा सोनू महाजन यांनी ९ मे रोजी पोलिसांकडे चोरीप्रकरणी तक्रार केली होती.
त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत चोरी केल्याप्रकरणी मुकुंदा भानुदास कोठावदे, भावेश मुकुंदा कोठावदे, भारतीय मुकुंदा कोठावदे, पप्पू मुकुंदा कोठावदे व लक्ष्मीबाई भानुदास कोठावदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
२ जून २०१६ ते ८ मे २०१९ यादरम्यान संबंधितांनी महाजन यांच्या घराचे कुलूप तोडून घरात अनधिकृत पणे प्रवेश करून साहित्यासह फर्निचर व सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. त्यात संसारोपयोगी साहित्यासह तीन तोळ्यांच्या बांगड्या, नेकलेस, सोन्याची पोत आदी दागिन्यांचा समावेश आहे.