चाळीसगावात आरोपी नगरसेवकाच्या उपस्थितीवरून पालिकेच्या सभेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 08:15 PM2019-02-11T20:15:34+5:302019-02-11T20:17:24+5:30
गुन्हा दाखल असलेल्या नगरसेवक सदस्याला सभेत बसू देऊ नये. तसा निलंबनाचा ठराव करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, सत्ताधारी गटाकडून अशी मागणी झाल्यानंतर विरोधी शविआनेदेखील नगरसेवक भर चौकात एकमेकांना भिडतात, असा पलटवार केल्याने पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकच गोंधळ उडाला.
चाळीसगाव, जि.जळगाव : गुन्हा दाखल असलेल्या नगरसेवक सदस्याला सभेत बसू देऊ नये. तसा निलंबनाचा ठराव करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, सत्ताधारी गटाकडून अशी मागणी झाल्यानंतर विरोधी शविआनेदेखील नगरसेवक भर चौकात एकमेकांना भिडतात, असा पलटवार केल्याने पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकच गोंधळ उडाला. अजेंड्यावरील विषयांऐवजी गांजा, वाळूचोरी, गुटखा विक्री अशा विषयांवर चर्चा भरकटल्याने नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी सभा तहकूब करून तीन दिवसांनी १३ रोजी पुन्हा सभा घेण्याचा निर्णय जाहीर केला.
पालिकेची सर्वसाधारण सोमवारी सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. एकूण ६७ विषय अजेंड्यावर होते. उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण यांच्यासह सत्ताधारी भाजपाचे गटनेते संजय रतनसिंग पाटील, शविआचे गटनेते राजीव देशमुख, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्यासह नगरासेवक उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच शहर विकास आघाडीचे नगरसेवक सूर्यकांत उर्फ बंटी ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने त्यांना सभागृहात बसू देवू नये. त्यांच्या निलंबनाचा ठराव करून तो जिल्हाधिकाºयांकडे पाठवावा, अशी मागणी सत्ताधारी गटाचे नगरसेवक व भाजपाचे शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी केली. यावर ही बाब न्यायप्रविष्ट असल्याचा मुद्दा शविआचे आनंदा कोळी, सुरेश स्वार यांनी मांडला. यामुळे सभेत एकच गोंधळ सुरू झाला. सभेच्या अजेंड्यावर हा विषय नसल्याने बाहेरील विषयावर चर्चा करणे चुकीचे असल्याचे शहरविकास आघाडीचे गटनेते राजीव देशमुख यांंनी सांगितले. सूर्यकांत ठाकूर यांनीही आपल्यावर झालेला गुन्हा हेतू पुरस्कर व राजकीय व्देषातून झाल्याची भूमिका मांडली. आपण न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करू, असेही ठाकूर यांनी सांगितले. मात्र घृष्णेश्वर पाटील यांनी ठाकूर यांच्यावर जो गुन्हा दाखल आहे, त्याबाबत पीडित तरुणीच्या पालकांनी सर्व नगरसेवकांना पत्र देऊन त्यांना पालिकेच्या सभागृहात बसू देवू नये, अशी सूचना केल्याचे निदर्शनास आणून दिले. हा मुद्दा त्यांनी चांगलाच लावून धरला. पत्राच्या अनुषंगाने मागणी केल्याचा मुद्दा त्यांनी लावून धरला. त्यामुळे गोंधळाचे वातावरण आणखीच वाढले. या प्रश्नावर सुमारे दीड तास खल चालला. नगरसेवक राजेंद्र चौधरी, रामचंद्र जाधव, विजया पवार, आनंद खरात, शेखर देशमुख, सविता राजपूत यांनीही आपले म्हणणे मांडले. मात्र चर्चेतून मार्ग न निघण्याऐवजी ती भरकटली. गोंधळ वाढतच गेल्याने राजेंद्र चौधरी यांनी मुख्याधिकाºयांनी याबाबत त्वरित निर्णय घ्यावा असे सांगितले.
नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अधिनियम १९९५च्या कायद्यात तशी तरतूद नसल्याने ठाकूर यांना सभागृहाबाहेर काढणे कायद्याच्या चौकटीत नसल्याचे सांगितले. मुख्याधिकाºयांनी कायद्याचे वाचन करून वस्तुस्थिती मांडावी असे म्हणणे मांडले. त्यार मुख्याधिकारी अनिकेतन मानोरकर यांनी कायद्याचे वाचन केले. मात्र त्यावरही गोंधळ सुरुच होता. घृष्णेश्वर पाटील व सूर्यकांत ठाकूर यांच्यात दाखल गुन्ह्यावरून तू तू मै मै सुरू झाली. माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, हे खरे आहे. पण मला आरोपी म्हणणे थांबवा, असा ठाकूर आर्जव यांनी केला.
सभागृहातील गोंधळ व तणाव वाढत असल्याने अखेर नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी हस्तक्षेप करुन चर्चा थांबविण्याची तंबी दिली. तरीही गोंधळ न थांबल्याने सभा तहकूब करुन पुन्हा तीन दिवसांनी सभा घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. सभेतील वादंगामुळे पहिल्यांदाच पालिकेची सभा तहकूब झाल्याने शहरात चर्चेला तोंड फुटले आहे.