चाळीसगाव नगर पालिकेत ‘सभापती’ निवडीला खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 07:19 PM2018-01-05T19:19:37+5:302018-01-05T19:23:53+5:30
सदस्य संख्येबाबत एकमत न झाल्याने जिल्हाधिकारी देणार निर्णय
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, दि. ५ : चाळीसगाव नगर पालिकेच्या पाच विषय समितींच्या सभापती निवडीसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता पिठासीन अधिकारी तहसीलदार कैलास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलविण्यात आली होती. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समितीमधील सदस्य संख्येबाबत एकमत न झाल्याने पुढील निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे. सभापती निवडीविनाच दुपारी दोन वाजता सभा संपली.
नगरपालिकेतील बांधकाम, शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य, महिला व बालकल्याण अशा पाच विषय समितीच्या सभापतींची एक वर्षीय मुदत जानेवारीत पुर्ण होत असल्याने शुक्रवारी निवडीची सभा बोलवण्यात आली होती.
नगरपालिकेत भाजपाची अपक्ष व शिवसेना सदस्यांच्या पाठिंब्यावर सत्ता असून विरोधी शहर विकास आघाडीचे १७ सदस्य आहेत. शविआने विषय समित्यांमध्ये प्रत्येकी आठ ते दहा सदस्य असावे असा आग्रह धरला होता. तर सत्ताधारी गट यात ११ सदस्य असावे. यासाठी आग्रही होता. सदस्य संख्येबाबत दोन्ही गटात एकमत न झाल्याने याबाबत जिल्हाधिकाºयांकडे पुढील निर्णयासाठी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय पिठासीन अधिकाºयांनी घेतला. यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशा चव्हाण, शविआ गटनेते राजीव देशमुख, भाजपा गटनेते राजेंद्र चौधरी, सुरेश स्वार, घृष्णेश्वर पाटील, आनंदा कोळी, शामलाल कुमावत यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी काय निर्णय देतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.