चाळीसगावात एक लाख क्विंटल कांद्याची आवक, भाव गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:53 PM2018-03-01T12:53:48+5:302018-03-01T12:53:48+5:30
सर्वाधिक कांदा नाशिक जिल्ह्यातील
आॅनलाइन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. १ - चाळीसगाव बाजार समितीमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात एक लाख १३ हजार ९४५ क्विंटल उन्हाळी कांद्याची विक्रमी आवक झाली असून यातील ऐंशी टक्के आवक नाशिक जिल्ह्यातून झाली आहे. आवक वाढल्याने दर गडगडले आहेत. गुरुवारीही दोनशे ट्रॅक्टर आवक झाली. गेल्या दोन महिन्यात सर्वाधिक कमी आठशे तर सर्वाधिक तीन हजार ६३५ प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
दोन वर्षापूर्वी बाजार समितीत स्वतंत्र कांदा लिलाव मार्केट सुरु करण्यात आले. त्याला पहिल्या वर्षीही कांदा उत्पादकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यातून होत आहे. आठवड्यातून चार दिवस येथे लिलाव होतात.
तेजीची झळाळी, मंदीचाही फटका
गेल्या दोन महिन्यात बाजार समितीच्या नागदरोड स्थित उपबाजार आवारात कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. उन्हाळी 'भगव्या' कांद्याची रेलचेल जास्त असून काही प्रमाणात पावसाळी कांदा देखील विक्रीसाठी येत आहे. गेल्या दोन महिन्यात भावाचे फार मोठे चढउतार पहावयास मिळाले. किमान आठशे तर कमाल चार हजार रुपये प्रतिक्विंटल अशी तेजीची झळाळीदेखील उत्पादकांनी अनुभवली.
एकाच दिवशी १९ हजार २०० क्विंटलची आवक
१२ फेब्रुवारीच्या कांदा लिलावात १९ हजार २०० क्विंटलची आवक ही गेल्या दोन महिन्यातील उच्चांकी आहे. याच दिवशी दर गडगडलेही. ८०० रुपये प्रतिक्विंटल असे नीचांकी भाव मिळाले.
४ जानेवारी रोजीच्या कांदा लिलावात चांगल्या प्रतिच्या कांद्याला तीन हजार ६३५ रुपये असा विक्रीमी भाव मिळाला. डिसेंबर महिन्यात हे दर चार हजार रुपये प्रतिक्विंटल असेही होते.
दरदिवशी दोनशे ट्रॅक्टरची आवक
यंदा तालुक्यात कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. तीन ते चार महिन्यात उत्पन्न हाती येत असल्याने काही शेतक-यांनी कपाशी पेरा कमी करुन कांदा लागवड केली. स्थानिक कांदा लिलावाची सोय झाल्याने शेतक-यांचा वाहतुक खर्चात मोठी बचतही होत आहे. पूर्वी कांदा उत्पादकांना विक्रीसाठी परजिल्ह्यात जावे लागत होते.
ऐंशी टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातील
चाळीसगावच्या लिलावात ऐंशी टक्क्याहून अधिक कांदा नाशिक जिल्ह्यातील आहे. वाहतुक सोय आणि मापे लवकर होत असल्याने नाशिक जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याचे बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले.