चाळीसगाव तालुक्यात शेतक-यांचा एल्गार, वाहतूक रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 03:01 PM2018-07-16T15:01:59+5:302018-07-16T15:04:27+5:30
आडगाव येथे सोमवारी सकाळी आठ वाजता शेतक-यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले.
चाळीसगाव: 'अरे कोण म्हणतो देणार नाही...घेतल्याशिवाय राहणार नाही, दुधाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे...' अशी जोरदार घोषणाबाजी करीत आडगाव येथे सोमवारी सकाळी आठ वाजता शेतक-यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले. तालुकाध्यक्ष आर.के.पाटील यांनी नेतृत्व करतांना एक तास वाहतूक रोखून धरली. यामुळे चाळीसगाव - मालेगाव रस्त्यावर वाहनांची लांब रांग लागली होती.
दुधाचे दर पडल्याने शेतकरी आणि पशुपालक कमालीचे धास्तावले आहे. खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी दुध व्यवसायाची स्थिती असल्याने सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. जोरदार घोषणाबाजी करुन आंदोलक शेतक-यांनी परिसर दणाणून टाकला.
सद्यस्थितीत शेतांमध्ये खरीप हंगामाची लगबग सुरु असतांनाही सकाळी सात वाजेपासून शेतक-यांनी आडगाव बसस्थानकावर गर्दी केली होती. तीनशेहून अधिक शेतकरी, पशुपालकांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी मागण्या मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सरकार शेतक-यांच्या मागण्यांबाबत पुर्णपणे उदासिन आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही निर्धार केला आहे.
- आर.के.पाटील
तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना