चाळीसगाव तालुक्यात चांभार्डी येथे आगीत चार झोपड्या जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:57 PM2020-02-21T18:57:23+5:302020-02-21T18:58:23+5:30
चांभार्डी बुद्रूक येथे पाचोबा वस्तीवर अचानक आग लागून चार झोपड्या जळून खाक झाल्या.
चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील चांभार्डी बुद्रूक येथे पाचोबा वस्तीवर अचानक आग लागून चार झोपड्या जळून खाक झाल्या. वेळीच आजूबाजूच्या रहिवाशांनी पाणी आणून आग विझविल्यामुळे बाजूच्या २० ते २५ झोपड्या आगीतून बचावल्या आहेत. या आगीत प्राणहानी झाली नसली तरी लाखों रुपयांचे संसारोपयोगी वस्तूंसह कागदपत्रे जळून खाक झाली आहे. ही घटना २० रोजी रात्री दहाला घडली. या घटनेने चारही झोपड्यांवरील कुटुंब रस्त्यावर आले आहे.
या घटनेत चिंतामण एकनाथ सोनवणे, जिभाऊ भीकमाळी (भिल्ल), भिका सोमा माळी (भिल्ल) व गणेश माळी (भिल्ल) यांचे नुकसान झाले आहे. एका घरात दिवा जळत होता आणि त्यातून आग लागल्याची चर्चा परिसरात होती. मात्र नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
२१ रोजी पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य अभय सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व संबंधित नुकसानग्रस्त लोकांशी चर्चा केली. या आपद्ग्रस्तांना तातडीने सानुग्रह अनुदान तसेच भिल्ल जातीची कागदपत्रे जळून खाक झाल्यामुळे तेही लवकर मिळवून द्यावेत, अशी मागणी प्रमोद पाटील यांनी तहसीलदार मोरे यांच्याकडे केली आहे.
पंचायत समितीचे सभापती अजय पाटील यांनी घटनास्थळी ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने चारही नुकसानग्रस्त नागरिकांचे नवीन घरकुल प्रस्ताव मंजूर करण्याचे सांगितले. यावेळी नेताजी पाटील, अशोक पाटील, संतोष भिल्ल, गणेश देवरे, विजय देवरे, जितेंद्र पाटील, रावण पाटील आदी उपस्थित होते.