चाळीसगाव तालुक्यात रात्र वैऱ्याची अन् दिवसा धडपड जगण्याची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:20 PM2017-12-02T15:20:20+5:302017-12-02T15:23:34+5:30
पोटाची खळगी भरण्याची नागरिकांना चिंता : बिबट्याच्या दहशतीने जगणे झाले कठीण
आॅनलाईन लोकमत
वरखेडे, ता.चाळीसगाव,दि.२ : गेल्या तीन महिन्यांपासून बिबट्याने या भागात उच्छाद मांडला आहे. यामुळे येथील नागरिकांना रात्र वैºयाची, तर दिवसा मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
दिवसा शेतात काम करताना बिबट्या कुठून येईल, हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. सहकारी सोबत असल्यामुळे दिवस तर निघून जातो, मात्र रात्र निघता निघत नाही. घराबाहेर साधी मांजरदेखील आली तरी अंगात धडकी भरते, झोप मोडली की, पुन्हा झोप लागत नाही. अंगणात बांधलेल्या गायीची काळजी वाटते.
बिबट्याने कुत्र्याच्या सात पिलांचा पाडला फडशा
वरखेडे येथील गिरणा नदी पात्रातील भुराठचा पानथा येथे पहाटे पाचच्या सुमारास बिबट्याने कुत्र्याच्या सात पिलांचा फडशा पाडला.
वरखेडे खुर्द येथे बिबट्याचा हैदोस
वरखेडे खुर्द येथील झोपडपट्टीजवळ बिबट्याने रात्री साडेनऊपासून अकरापर्यंत धुमाकूळ घातला. येथे असलेले माजी पोलीस पाटील ओंकार शंकर तिरमली यांच्या घराबाहेर बैलजोडी बांधलेली होती. बैलजोडीकडे बिबट्या येत असल्याचे कुत्र्यांनी पाहिले. तेव्हा मोठ्याने भुंकत कुत्र्यांनी वस्तीतील नागरिकांना जागे केले. यानंतर वस्तीवरील नागरिकांनी बिबट्याला पळवून लावले. मात्र तरीही बिबट्या पुन्हा आला असे तीन वेळा घडले. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी आल्याने बिबट्या पसार झाला.
वाडे शिवारातही बिबट्याचा संशय
भडगाव-तालुक्यातील वाडे शिवारात संजय भोपाल परदेशी हे सकाळी म्हशीचे दूध काढण्यासाठी गेले. तेव्हा अचानक गायी-म्हशी ओरडून खुंट्यांवरील दोर तोडण्याच्या प्रयत्नात होते. ही बाब परदेशी यांच्या निदर्शनास येताच त्यांना बाजुच्या केळीतून प्राणी पळण्याचा आवाज आला. केळी बागेत पायाचे मोठे ठसे पाहता ते बिबट्याचे असावेत, असा त्यांना संशय आहे. ही माहिती त्यांनी इतरांना कळविली. नागरिकांनी घटनास्थळी लाठ्या-काठ्यांसह पाहणीही केली. तसेच बाजूच्या सुरतसिंग सरदारसिंग परदेशी यांच्या केळी बागेतही बिबट्याच्या पायाचे ठसे असावेत, असे नागरिकांनी सांगितले़
तळई येथे बिबट्याच्या भीतीने मजुरांची धावपळ
तळई, ता. एरंडोल येथे नाना गजमल पाटील यांच्या शेतात शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने मजुरांची धावपळ उडाली.बिबट्यास जेरबंद करण्यासाठी गस्तीपथक व खुले भक्ष्य पथक यांची फेररचना करण्यात आली आहे. तसेच कॅपेरा ट्रॅपची संख्याही आता बारापर्यंत वाढविण्यात आली आहे.