चाळीसगाव तालुक्यात आरोग्य विभागच ‘सलाईनवर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:15 PM2017-09-22T12:15:04+5:302017-09-22T12:18:19+5:30
52 पदे रिक्त, 49 आरोग्य केंद्रांना ‘समस्यां’ची लागण
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 21 - साथरोगांसह स्वाइन फ्लू या गंभीर आजारांचे रुग्ण आढळत असताना ग्रामीण भागातील सव्वातीन लाखाहून अधिक लोकसंख्येच्या आरोग्याची काळजी घेणारा आरोग्य विभागच सलाईनवर असल्याचे धक्कादायक चित्र आहे. 10 प्राथमिक आरोग्य व 39 उपकेंद्रांमध्ये एकूण 52 पदे रिक्त असल्याने कर्मचा:यांवर मोठा ताण पडण्यासह रुग्णसेवेवर परिणाम होत आहे.
चाळीसगाव तालुक्याची लोकसंख्या सव्वाचारलाखाहून अधिक आहे. ग्रामीण भागात सव्वातीन लाख लोकसंख्या वास्तव्यास असून जनतेचे तालुका आरोग्य विभागाच्या हाती आहे. मात्र पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साथरोगांचा फैलाव
ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर साथरोगांचा फैलाव झाला असून दवाखाने सद्यस्थितीत फुल्ल आहेत. डेंग्यू सदृश्य आजारानेही डोके वर काढले असून स्वाइन फ्लू झालेले रुग्णही आढळले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेच्या ठळक उणीवादेखील स्पष्ट झाल्या आहे. कर्मचा:यांची संख्या अपूर्ण असल्याने रुग्णांवर तात्काळ उपचार होत नसल्याच्या तक्रारी आहे.
वैद्यकीय अधिका:यांची पाच पदे रिक्त असून मंजूर आठ पदांपैकी तीन प्रा.आ. केंद्रात वैद्यकीय अधिकारी आहे. लोंढे प्रा.आ. केंद्रावरील दोघेही पदे रिक्त तर उंबरखेडे, शिरसगाव, पातोंडे येथे दोन पैकी प्रत्येकी एकच वैद्यकीय अधिका:यावर भार आहे.
आरोग्यसेविकांची 16 पदे रिक्त आहेत.
तालुक्यासाठी 59 पदे मंजूर असताना 43 आरोग्य सेविकांवर 49 प्रा.आ. केंद्रांची जबाबदारी आहे. तळेगाव, वाघळी येथे महिला सहाय्यक आरोग्य अधिकारीच नाही. दहीवद, धामणगाव, खेडगाव, पोहरे, बहाळ-1, बहाळ-2, जामदा, लोंढे, दरेगाव, पातोंडे-1, पातोंडे ओपीडी, पिलखोड, उपखेड, माळशेवगे आदी गावांमध्ये आरोग्य सेविकांची प्रतीक्षा आहे.
आरोग्य सेवकांची 49 पदे मंजूर असताना 37 सेवक कार्यरत असून 12 पदे रिक्त आहेत. दहीवद, मेहुणबारे, शिरसगाव, ब्राम्हणशेवगे, मांदुर्णे, उपखेड, शिंदी, उंबरखेडे, देवळी, हातले, वाघळी आदी प्रा.आ. केंद्रांमध्ये पुरुष आरोग्य सेवकांची कमतरता आहे.
खेडगाव, रांजणगाव, शिरसगाव, तळेगाव, तरवाडे, उंबारखेडे येथील प्रा.आ. केंद्रांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञांची एकूण सहा पदे रिक्त आहे. नऊ वाहन चालक, दाहीवद (एक), लोंढे (तीन), वाघळी (एक), उंबरखेडे(एक) अशी एकूण परिचरची सहा तर औषध निर्माण अधिका-याचे एक अशी पदेही रिक्तच आहेत. मंजुर 152 कर्मचा:यांपैकी 52 पदे रिक्त आहे. सव्वातीनलाख लोकसंख्येचे आरोग्य अवघ्या 100 कर्मचा:यांवर एकवटले आहे.
उपजिल्हा रुग्णालय केव्हा?
तीन जिल्ह्याच्या सीमेवरील तालुका, गेल्या काही वर्षात अपघातांची वाढलेली संख्या, सव्वा चार लाखाहून अधिक लोकसंख्या असे चाळीसगाव तालुक्याचे मोठी जागा घेणारे चित्र असले तरी आरोग्याच्या सुविधांचा मात्र दुष्काळच आहे. गेल्या अनेक वषार्पासून येथे उपजिल्हा रुग्णालयाची मागणी असतांना ती अद्यापही पूर्ण होऊ शकली नाही. मध्यंतरी काही मोठे अपघात झाल्यानंतर येथील अस्थिपंजर आरोग्य यंत्रणेच्या मयार्दा समोर आल्या आहेत. त्यामुळे गंभीर परिस्थीतील रुग्णांना उपचारासाठी धुळे, नाशिक किंवा औरंगाबाद येथे हलवावे लागते. यात वेळेवर उपचार न होऊ शकल्याने काही रुग्ण दगावले आहे.
शहरातील ग्रामीण रुग्णालय देखील नावालाच असून प्रसुती व अन्य किरकोळ उपचार तेवढे येथे केले जातात. एकीकडे शहरात खासगी रुग्णालयांच्या चकाचक टोलजंगी इमारती उभ्या राहत असतांना शासकीय आरोग्य यंत्रणा मात्र मृतशय्येवर आहे. येथील शवविच्छेदन गृहाची अवस्थाही भीषण असल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावाना आहे.