चाळीसगावला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी मातब्बरांचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:57+5:302021-06-18T04:11:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : ‘मिनी मंत्रालय’ असे वलय असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत अनुक्रमे २० व ...

Chalisgaon will have to work hard for Zilla Parishad, Panchayat Samiti elections | चाळीसगावला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी मातब्बरांचा लागणार कस

चाळीसगावला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी मातब्बरांचा लागणार कस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : ‘मिनी मंत्रालय’ असे वलय असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत अनुक्रमे २० व १३ मार्च २०२२ रोजी संपत असल्याने निवडणुकांसाठी गट व गणांची माहिती संकलित करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील लोकसंख्येची आकडेवारी तहसीलकडून मागवली असून, आगामी काळात होणाऱ्या या घमासानासाठी मातब्बरांचा कस लागणार, हे स्पष्ट आहे. २०११च्या लोकसंख्येनुसारच आरक्षणही जाहीर होण्याची शक्यता असल्याने याबाबतही राजकीय क्षेत्रासह गावपातळीवर औत्सुक्य आहे.

जिल्हा परिषद आणि १५ पंचायत समित्यांची मुदत अनुक्रमे २० व १३ मार्च २०२२ रोजी संपत आहे. जिल्हा परिषदेत ६७ गट, तर पंचायत समित्यांचे १३४ गण आहेत. तालुकानिहाय ग्रामीण भागातील लोकसंख्या प्रमाणित प्रपत्रामध्ये जिल्हा प्रशासनाकडून मागविण्यात आली आहे. चाळीसगाव तहसील प्रशासनालादेखील ४ जून रोजी असे पत्र प्राप्त झाले असून, प्रपत्रामध्ये लोकसंख्येची माहिती पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलच्या सुत्रांनी दिली.

चौकट

सर्व पक्षीयांसाठी सामना चुरशीचा

सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर आणि २०१९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी म्हणजेच २०१६ला या मिनी मंत्रालयांची रणधुमाळी झाली आहे. साहजिकच सव्वा चार वर्षात राजकारणाच्या पुलाखालून नवनवीन समीकरणांचे बरेच पाणी वाहून गेले आहे. २०२२मध्ये होऊ घातलेले घमासान म्हणूनच सर्वपक्षीयांसाठी चुरशीचे ठरणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सात गटात राष्ट्रवादी भाजपापेक्षा वरचढ ठरला आहे. सातपैकी चार जागांवर राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाला, तर तीन जागांवर भाजपाचे कमळ उमलेले होते. बहाळ - कळमडू, सायगाव - उंबरखेडे, रांजणगाव - पिंपरखेड, तळेगाव - देवळी हे चार गट राष्ट्रवादीने राखले होते. भाजपाने दहिवद - मेहुणबारे, टाकळी प्र. चा. - करगाव, वाघळी - पातोंडा या गटांमध्ये मुसंडी मारली होती.

- या सात गटांपैकी अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे दोन गट महिलांसाठी राखीव आहेत.

-सर्वसाधारण प्रवर्गाचे तीन, तर नागरिकांचा मागास प्रवर्गचे दोन अशी आरक्षणाची स्थिती आहे.

आरक्षणाबाबत मोठी उत्सुकता

ओबीसींच्या आरक्षणाचे त्रांगडे तसेच असल्याने निवडणुकांचा बिगूल वाजण्यापूर्वी जाहीर होणाऱ्या आरक्षणाबाबतही मोठी उत्सुकता आहे. आरक्षणानंतरच खरी स्थिती स्पष्ट होईल. अर्थात मातब्बरांकडून आतापासूनच ‘सेफ झोन’ची चाचपणी केली जात आहे. २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा रणधुमाळीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही रंगीत तालीम ठरणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर नव्याने समीकरणे अस्तित्त्वात येतील.

चौकट

पंचायत समितीचा सामना ‘बरोबरीत’

पंचायत समितीच्या १४ गणांमध्ये भाजपा - राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच झाली. अर्थात दोघांनाही प्रत्येकी सात अशा समान जागा मिळाल्या. यात शिवसेनेची हजेरी निरंक ठरल्याने आगामी निवडणुकीत सेनेला चांगलीच कंबर कसावी लागणार आहे.

१...कळमडू, सायगाव, उंबरखेड, रांजणगाव, पिंपरखेड, देवळी, तळेगाव या सात गणांमध्ये राष्ट्रवादीने विजयी गुलाल उधळला.

२...भाजपाने बहाळ, पातोंडा, दहिवद, मेहुणबारे, करगाव, टाकळी प्र. चा., वाघळी हे सात गण काबीज केले होते.

३...सामना बरोबरीत सुटला असला तरी, पहिल्या टर्ममध्ये सभापती, उपसभापती निवडीत भाजपाने राष्ट्रवादीला चेकमेट दिला. दुसऱ्या टर्ममध्ये मात्र राष्ट्रवादीने याची परतफेड करीत पंचायत समितीवर झेंडा रोवला.

४..सर्वसाधारण प्रवर्ग चार, तर अनुसूचित जमाती एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन अशा आरक्षणानुसार सात महिला सदस्या आहेत.

५...सर्वसाधारण तीन, अनु. जाती आणि जमाती प्रत्येकी एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन असे पुरुष सदस्यांच्या सात जागांचे आरक्षण आहे.

६.जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षणासाठी वेगवेगळे निकष आहेत.

चौकट

चाळीसगावच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या तीन लाख १७ हजार ३२८ इतकी असून, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या २०२२ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुका २०११च्या जनगणनेनुसार होतील. यासाठी तहसील प्रशासनाने ग्रामीण भागातील लोकसंख्येची माहिती जिल्हा प्रशासनाला पाठवली आहे.

एकूण लोकसंख्या (ग्रामीण)

- ३,१७,३२८

अनु. जाती -

३१,४४२ अनु. जमाती -

४२,३३२ ........... पक्षीय बलाबल जि. प. एकूण सात गट राष्ट्रवादी - ४

भाजपा - ३

पंचायत समिती एकूण गण - १४ भाजपा - ७

राष्ट्रवादी - ७

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आगामी निवडणुकीसाठी ग्रामीण भागाची लोकसंख्या पाठविण्यासंबंधी गत आठवड्यात जिल्हा स्तरावरून पत्र मिळाले आहे. त्यानुसार प्रपत्रामध्ये लोकसंख्येविषयी माहिती पाठवली आहे.

-अमोल मोरे,

तहसीलदार, चाळीसगाव.

Web Title: Chalisgaon will have to work hard for Zilla Parishad, Panchayat Samiti elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.