चाळीसगावकरांनो पिण्याचे पाणी जपून वापरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:00 PM2021-03-11T23:00:45+5:302021-03-11T23:02:47+5:30

निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा ५०.२३ टक्क्यांवर आला आहे.

Chalisgaonkars use drinking water carefully! | चाळीसगावकरांनो पिण्याचे पाणी जपून वापरा !

चाळीसगावकरांनो पिण्याचे पाणी जपून वापरा !

Next
ठळक मुद्देउन्हाळ्याची सलामी : गिरणा ५०.२३ तर मन्याडमध्ये ३० टक्के जलसाठा पिण्याच्या पाण्याचे यापुढे मिळणार दोनच आवर्तने

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा ५०.२३ टक्क्यांवर आला असून मन्याडमध्येही ३० टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चाळीसगावकरांनो, पाणी जपूनच वापरा, असा सायरन वाजला आहे. या वर्षातील सिंचनासाठी दिली जाणारी तीन आवर्तने पूर्ण झाली असून यापुढे पिण्याच्या पाण्यासाठी दोनच आवर्तने मिळणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या धरणांमध्ये गणना होणाऱ्या गिरणा धरणावरुनच निम्म्या जिल्ह्यासह चाळीसगाव शहर, मालेगाव, नांदगाव आदी ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच धरणातील साठा निम्म्यावर आला आहे. अजून तीव्र उन्हाळ्याचे एप्रिल व मे हे महिने पार करावयाचे असून जूनमध्ये पावसाच्या सुरुवातीवरही बरेचसे गणित अवलंबून असते. त्यामुळे शिल्लक जलसाठा तीन महिने पुरवावा लागणार आहे. पाऊस लांबल्यास हे गणित बिघडूही शकते. तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होते. आवर्तन सोडल्यानंतर देखील बाष्पीभवनामुळे पाणी वाहण्याचा वेग मंदावतो. यावर्षी शतकी सलामी देणाऱ्या मन्याड मध्येही ३० टक्केच जलसाठा उरला आहे.

गिरणा धरण निम्मे : ५०.२३ टक्के जलसाठा

२१५०० दलघफू जलसाठवण क्षमता असणाऱ्या गिरणा धरणात गुरुवार अखेर १२२९३.४५ जलसाठा असून यातील तीन हजार दलघफू मृतसाठा वगळल्यास ९२९३.४५ जलसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ५०.२३ अशी आहे. उपयुक्त जलसाठा १८५०० दलघफू गणला जातो. धरणातून मालेगाव, चाळीसगाव व नांदगावसह दहीवाळ तसेच २५ गावे याबरोबरच जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १५४ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. गतवर्षी १६ सप्टेंबर रोजी गिरणा धरणाने सेंच्युरी ठोकली होती. यानंतर गत सहा महिन्यात धरणातील ४९.७७ टक्के जलसाठा संपला असून सद्यस्थितीत ५०.२३ जलसाठा उरला आहे. या साठ्यावर अजून पुढचे चार महिने अवलंबून आहे.

मन्याड ३० टक्क्यांवर

१९०५ दलघफू साठवण क्षमता असणाऱ्या मन्याड धरणात गुरुवार अखेर ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. ४८३ दलघफू जलसाठा मृतसाठा म्हणून गणला जातो. या धरणाचा परिसरातील ३० गावांना मोठा फायदा होतो. २०१६ नंतर तब्बल तीन वर्षांनी म्हणजेच २०१९ मध्ये मन्याड ओव्हरफ्लो झाले होते. गेल्यावर्षी दोन ऑगस्ट रोजी त्याने शतकी सलामी दिली. गत सात महिन्यात या धरणातील ७० टक्के जलसाठा वापरला गेला आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी दोन आवर्तने

गिरणा धरणावर अवलंबित्व असणाऱ्या मोठ्या शेती क्षेत्राला सिंचनाचे या वर्षातील तीन आवर्तने यापूर्वीच दिली गेली असून यापुढे पिण्याच्या पाण्यासाठीच दोन आवर्तने सोडण्यात येणार असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली. सद्यस्थितीत उन्हाचा पारा वाढत आहे. तापमानातही वाढ होत असून येत्या काळात पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे. आवर्तन सोडल्यानंतरही उन्हाळ्यात बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते.

Web Title: Chalisgaonkars use drinking water carefully!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.