‘पद्मदुर्ग’ला चाळीसगावच्या ‘तोफगाड्याची सलामी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 06:17 PM2019-05-04T18:17:25+5:302019-05-04T18:19:06+5:30
‘स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे...’ अशा ओळी सहज गुणगुणल्या तरी छाती अभिमानाने फुगून येते. गड-किल्ल्यांवर असणाऱ्या तोफा जणू शौर्याची गाथाच! याच इतिहासावर आपल्या कलाकुसरीची फुले वाहतांना चाळीसगावच्या कारागिरांनी रायगड जिल्ह्यातील पद्मदुर्ग येथे लावण्यात येणारे चार कलात्मक ‘तोफगाडे’ साकारले आहेत.
जिजाबराव वाघ
चाळीसगाव : ‘स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे...’ अशा ओळी सहज गुणगुणल्या तरी छाती अभिमानाने फुगून येते. गड-किल्ल्यांवर असणाऱ्या तोफा जणू शौर्याची गाथाच! याच इतिहासावर आपल्या कलाकुसरीची फुले वाहतांना चाळीसगावच्या कारागिरांनी रायगड जिल्ह्यातील पद्मदुर्ग येथे लावण्यात येणारे चार कलात्मक ‘तोफगाडे’ साकारले आहेत. यासाठी येथील युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांनी दोन लाखाचे दातृत्व दिले असून, सह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून तयार झालेल्या तोफगाड्यास पाश्चिमात्य लूक दिलाय. १९ रोजी पद्मदुर्गला या तोफगाड्यांची सलामी दिली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधतानाच महाराष्ट्रातल्या बहुसंख्य डोंगर शिखरांवर चढवलेला किल्ल्यांचा साज आजही रोमांच उभे करतो. परकीय सत्तांना थोपविण्यासाठी बांधलेले जलदुर्ग म्हणजे आगळेवेगळे वैशिष्ट्यच. रायगडजवळ उभारलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे व उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या संकल्पनेतून चार तोफगाडे गेल्या दोन महिन्यापासून चाळीसगाव येथील चार लाकूड काम करणारे कारागिर तयार करीत असून, १९ मे रोजी एका मोठ्या दिमाखदार सोहळ्यात या तोफगाड्यांवर पद्मदुर्गच्या तोफा ठेवण्यात येणार आहे.
साडेसहाफूट लांबीचा तोफगाडा, एक हजार किलो वजन
मध्ययुगीन काळातील कलाकुसर साकारताना कारागिरांची कसोटी लागते. ऐतिहासिक वस्तुंची डागडुजी करतानाही त्यांचे पुरातन वैभव जपणे आवश्यक असते. चाळीसगावच्या गणेशरोडलगतच्या गंगा सॉ मिलचे मालक आणि दुर्गप्रेमी अजय जोशी यांनी तोफगाडे तयार करण्याचे आवाहन पेलले. त्यांच्यासह कारागिर दिलीप अहिरे, भगवान शिंदे, सुनील शिंदे यांच्यासह स्वत: अजय जोशी गेल्या दोन महिन्यांपासून चार तोफगाडे बनवित आहे. लवकरच हे तोफगाडे पद्मदुर्गकडे आगेकुच करणार आहेत.
साडेसहा फूट लांब व दोन फूट रुंदीचे चार तोफगाडे पूर्णपणे सागवान लाकडात तयार करण्यात आले आहे. तोफगाड्याचे वजन एक हजार किलो आहे. काही प्रमाणात लोखंड आणि लाकूड यांचा वापर केला गेला आहे.
पद्मदुर्गवर बसविण्यात येणाºया तोफगाड्यांना पारंपरिक रुपडे देण्याऐवजी अजय जोशी स्काटलँड येथील पाश्चिमात्य तोफगाड्याचा लूक दिला आहे. देशात प्रथमच असे पाश्चिमात्य तोफगाडे बनविल्याचा त्यांचा दावा आहे. सोयगाव येथील वेताळगडावर नुकताच एक तोफगाडा बसविण्याचा सोहळा पार पडला. हा तोफगाडादेखील अजय जोशी यांनीच साकारला आहे.
दोन लाखाचे दातृत्व
चाळीसगाव येथील युवा उद्योजक मंगेश रमेश चव्हाण यांनी तोफगाडे तयार करण्याचे दातृत्व स्वीकारले आहे. एका तोफगाड्यासाठी ५० हजार रुपये खर्च आला आहे. याआधीही चव्हाण यांनी शहरात १६ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासह तालुक्यातील काही प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळांचे साहित्य दिले आहे.