वनजमीन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराला पकडण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:46 PM2019-01-17T12:46:05+5:302019-01-17T12:46:42+5:30
विश्लेषण
सुशील देवकर
जळगाव: जळगाव तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवार व परिसरातील वनविभागाच्या जमिनींची परस्पर विक्री केल्याचे प्रकार घडले असून आतापर्यंत सुमारे २२८८ एकर जमिनची अशाप्रकारे विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही मुख्य सूत्रधार मुकुंद ठाकूर यास अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. आधीच एका प्रकरणात फरार असलेल्या मुकुंद ठाकूर याच्यावर पोलिसांकडून कारवाई झालेली नसताना वनजमीन विक्री प्रकरणात गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे शेतजमिनीच्या व्यवहारात आम्हा सर्व खरेदी देणार व घेणार अशा सर्वांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार मुकुंद बलविरसिंह ठाकूर, शिवानी इस्टेट ब्रोकर हाच असल्याचा आरोप वनजमीन खरेदी-विक्री केलेल्या नेहा कांतीलाल शर्मा, अभिमन्यू अर्जुन पाटील, दिलीप पंडीत सोनवणे, संदीप सुरेश पाटील, रमेश आनंदा पाटील यांनी चौकशी समितीसमोर २८ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेल्या जबाबात केला आहे. या वनजमीन घोटाळ्याचा सूत्रधार मुकुंद ठाकूर असला तरीही त्याच्या नावावर वनजमीन वर्गच झालेली नसल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे तो सहज सुटुन जाईल, असा दावाही केला जात होता. मात्र चौकशी समितीसमोर काही खरेदीदारांनी दिलेल्या जबाबात विखरण ता.एरंडोल येथील राष्टÑीय महामार्ग क्र.६ लगत असलेला रामेश्वरी नंदलाल शर्मा यांच्या मालकीच्या शेतगट नं.२८४ क्षेत्र ०.३३ हे.आर. या शेतजमिनीची खरेदी रूपेश भिकचंद तिवारी यांनी दुय्यम निबंधक एरंडोल येथे १४ फेब्रुवारी २०१४ रोजी केलेली असून हा गट त्यानंतर रूपेश भिकचंद तिवारी यांनी २० जून २०१४ रोजी दस्त क्र.२०९५/२०१४ अन्वये दि.२० जून २०१४ रोजी नवनाथ दारकुंडे यांना विक्री केला.त्यानंतर दारकुंडे यांनी २५ फेब्रुवारी २०१५ रोजी मुकुंद ठाकूर व उमाकांत त्र्यंबक कोल्हे यांना विक्री केला आहे. हा व्यवहार रोख स्वरूपात झालेला असल्याचा दावा केला आहे. खरेदीखतही सादर झाले आहे. त्यामुळे मुकुंद ठाकूर विरूद्ध पोलिसांकडे या प्रकरणात सहभागी असल्याचा लेखी पुरावा सापडला आहे. त्यामुळे आता तरी पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई करून त्यास अटक करण्याची मागणी या प्रकरणात फसवणूक झालेल्यांकडून होत आहे. मुख्य सूत्रधाराला अटक झाली तरच या प्रकरणातील पडद्याआड असलेले राजकीय धेंडांची नावेही अधिकृतपणे समोर येतील.