आव्हान देईल त्याला आडवा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:48 AM2019-02-03T11:48:45+5:302019-02-03T11:49:08+5:30
गुलाबराव पाटील यांची महाजन यांच्यावर टीका
जळगाव : आपण लंगोट घेऊन फिरणारे नाही तर बांधून फिरणारे आहोत. कुस्ती गादीवरची नाही मातीवर खेळणारे पहिलवान आहोत. शिवसेना संपविण्याची भाषा करणाºयांना धडा शिकविण्याची तयारी ठेवा. युतीचे टेंशन घेऊ नका, आव्हान देईल त्याला आडवा करा, असा जोरदार पलटवार सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर शनिवारी येथे केला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा दौºयावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा खान्देशातील प्रचाराचा नारळ त्यांच्या हस्ते वाढविला जाण्याचे संकेत आहेत. यानिमित्त होणाºया जाहीर सभेच्या नियोजनासाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी शनिवारी दुुपारी शिवसेनेचे जिल्हा, तालुका पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. सभेस माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार किशोर पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, विशेष संपर्क प्रमुख विलास पारकर, माजी आमदार आर. ओ.पाटील, चिमणराव पाटील, कैलास पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, मनपातील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, संजय शिरोडकर यांची उपस्थिती होती.
ही सर्वांसाठीच संधी
लोकसभा निवडणूक, दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा दौरा असल्याचे सांगून गुलाबराव पाटील म्हणाले की, युतीचे टेंशन तुम्ही घेऊ नका त्याबाबत काय करायचे याचा निर्णय वरिष्ठ मंडळी घेतील. आपण लंगोट घेऊन नाही तर बांधून तयार असतो आपण गादीवरची नाही तर मातीवर कुस्ती खेळणार पहेलवान आहोत.
त्यांचे यश हे आमच्या मुळे
जळगाव लोकसभा मतदार संघात प्रारंभापासून शिवसेनेचे प्राबल्य राहीले आहे. भाजपाकडे असलेल्या विधानसभा मतदार संघापेक्षा अधिक मताधिक्य अगदी एम.के. अण्णा पाटील यांच्यापासून शिवसेनेने दिले आहे. या भागात जि.प., पं.स. सदस्य, पंचायत समिती सदस्य हे आपले जास्त आहेत. त्यामुळे या मतदार संघावर खरा अधिकार शिवसेनेचाच आहे. शिवसेनेला संपविण्याची भाषा ते करतात त्यामुळे १५ ची सभा ही जास्तीत जास्त यशस्वी करून दाखविण्याची तुम्हाला संधी आहे. मागील निवडणुकीच्या वेळी इच्छा नसताना ए.टी. पाटील यांचा प्रचार करावा लागला. पक्षाचा आदेश होता. शिवसैनकाने प्रामाणिकपणे काम केले. धोका दिला नाही. ए.टी. पाटील हे खरे त्यामुळेच विजय झाले. पण आमचा विजय कामामुळे असे ते सांगतात असा चिमटा घेऊन बोहनीची ही सभा यशस्वी करा असे त्यांनी आवाहन केले.
ताकद दाखविण्याची संधी
उद्धव ठाकरे यांची सभा ही शिवसेनेची ताकद दाखविण्याची संधी असल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यावेळी म्हणाले. प्रचार हा एक भाग असला तरी या जिल्ह्यातील शेतकरी, दुष्काळाने होरपळत असलेल्या जनतेचे दुख जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे जिल्ह्यात येत आहेत. मी मंत्री झालो ते बाळासाहेबांमुळे ते त्यावेळी म्हणाले, दादा तुम्हाला कॉँग्रेसची ही लबाड मंडळी संधी देणार नाही. माझी सत्ता आली तर मी तुम्हाला मंत्री करेल व त्यांनी तो शब्द खरा करून दाखविला होता.
आज उद्धव ठाकरे हे लढत आहेत ते तुमच्या स्वाभीमानासाठी युतीचे सरकार म्हटले जात पण तसा मान तुम्हाला मिळत नसल्याची चिड त्यांच्या मनात आहे ते घेतील तो निर्णय सर्वांच्या हिताचा असेल, पाडायला निघालेल्यांना चारीमुंड्या चित करण्याची धमक घेऊन कामाला लागा, असेही सुुरेशदादा यावेळी म्हणाले.
प्रास्ताविक जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी तर सूत्रसंचालन प्रा. उत्तम सुरवाडे यांनी केले.
गाडण्याची भाषा करणाऱ्यांना गाडा
युती करणार नसेल तर त्यांना गाडा असे बोलणाºया भाजपाच्या नेत्यांना गाडण्याची हिंमत ठेवा,असे संपर्क प्रमुख संजय सावंत यावेळी म्हणाले. राज्यात युतीची खरी गरज आपल्यापेक्षा भाजपाला जास्त आहे. कारण त्यांच्या नेत्यांना युतीसाठी उद्धवजींच्या भेटीसाठी यावे लागते आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात जळगाव जिल्ह्यातून होत आहे त्यामुळे खान्देशच्या मातीतील ही सभा ऐतिहासिक ठरावी, असेही ते म्हणाले.
लोकांचा राग त्यांच्यावर
राज्यातील लोकांचा राग हा भाजपावर आहे मग आपण का त्या भट्टीत जायचे असा सवाल यावेळी माजी आमदार तथा सहसंपर्क प्रमुख आर. ओ. पाटील यांनी केला. विलास पारकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
जागा आपल्याकडे घ्या
राज्यात युती होईल की नाही हे फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहे. पण युती झाली तरी जळगावची जागा शिवसेनेकडे घ्यावी, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी केली. आज आपण सत्तेत असलो तरी भाजपा शिवसेनेला नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करत आल्याबाबत नाराजीही त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार चिमणराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.