भाजपासमोर वर्चस्व टिकविण्याचे आव्हान
By admin | Published: January 22, 2017 12:45 AM2017-01-22T00:45:53+5:302017-01-22T00:45:53+5:30
अमळनेर : भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या अमळनेर तालुक्यात पक्षाला विधानसभेपाठोपाठ नगरपालिकेतही अपयश आले.
अमळनेर : भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या अमळनेर तालुक्यात पक्षाला विधानसभेपाठोपाठ नगरपालिकेतही अपयश आले. त्यामुळे तालुक्यात असलेले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपानेही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. स्वबळावर लढण्यापेक्षा भाजपाची आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीशी युती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरूद्ध भाजपा-आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडी यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे.
दोन टर्ममध्ये भाजपाचे वर्चस्व
गेल्या काही वर्षात तालुक्यात भाजपाचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झालेले होते. विधानसभा असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, यात भाजपाने निर्विवाद यश मिळविले आहे. 2007-08 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने पाच पैकी पाच जागांवर विजय मिळविला होता. तर 2011-12 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाच पैकी तीन जागांवर विजय मिळविला होता, तर पंचायत समितीच्या आठ गणांपैकी पाच जागा ताब्यात घेतल्या होत्या.
अंतर्गत कलहामुळे ओहोटी
मात्र आता स्थिती बदललेली आहे. भाजपाच्या विजयी रथाला ओहोटी लागली आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाचे तोंड पहावे लागले. 2011 मध्ये पालिकेत सत्ता मिळविली. मात्र ती पाच वर्षे टिकवता आली नाही. तालुक्यात भाजपाची असलेली घौडदौड कमी होत चालली आहे. याला पक्षातील दोन नेत्यांमधील अंतर्गत कलहाचीही पाश्र्वभूमी आहे. तालुक्यात भाजपाला मिळणारे अपयश ही नेत्यांसाठी चिंतेची बाब ठरलेली आहे.
महाआघाडीची शक्यता
गेल्यावर्षी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, व शहर विकास आघाडीने एकत्र येत विजयी पताका फडकविली आहे. त्यामुळे त्या पक्षातील नेत्यांचा विश्वास दुणावलेला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडीचा निर्णय झालेला आहे. यात शहर विकास आघाडीचा समावेश करून महाआघाडी तयार करण्याचा प्रय} सुरू आहे. यासंदर्भात दोन्हीत पक्षीय पातळीवर चर्चा सुरू असून, सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. नगरपालिकेचा फॉम्यरुला जि.प., पं.स.त कायम रहावा असा आग्रह अनेकांचा आहे.
..तर भाजपाला फटका
महाआघाडी झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका भाजपालाच बसणार असा अंदाज आहे. राज्यात भाजपा-सेना युती असली तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत युती होईल अशी तूर्ततरी चिन्हे नाहीत. शिवसेनेने सद्या तरी स्वबळाचा नारा दिलेला आहे.
चौधरी गटाची पहिलीच निवडणूक
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणात आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीही उतरणार आहे. जि.प., पं.स.स्तरावर त्यांची तालुक्यातील ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत यश मिळवून खाते उघडण्याची या आघाडीचेही प्रय} सुरू आहेत.
युतीसाठी प्रय}
तालुक्यात कॉँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला रोखण्यासाठी जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप व आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडी यांच्यात युती होण्याची दाट शक्यता आहे. या युती संदर्भात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, तर आमदार गटातर्फे आमदार शिरीष चौधरी, आघाडीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चौधरी, पंचायत समितीचे उपसभापती उदय पाटील, नगरसेवक प्रवीण पाठक यांच्या उपस्थितीत नुकतीच जळगावला बैठक झालेली आहे. यात युतीसंदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे. ही युती होईल हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे तालुक्यात आघाडी विरूद्ध युती असाच सामना रंगेल.
ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भाजपाला तालुक्यात आपले अस्तित्व टिकवायचे आहे. आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीला नवीन वर्षाचा शुभारंभ स्थानिक स्वराज्य निवडणुकीत विजयी पताका फडकवून करायचा आहे. तर न.पा.प्रमाणेच कॉँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला विजयाची घौडदोड कायम राखायची आहे.
आता घोडा-मैदान जवळ आहे. कोणाला कितपत यश मिळते ते निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.