आव्हाणे, खेडी भागातील साठ्यांचे दिवसभर चालले पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:16 AM2021-02-10T04:16:33+5:302021-02-10T04:16:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - तालुक्यातील आव्हाणे व खेडी येथे गिरणा पात्रातून अनधिकृत वाळू साठ्यांवर प्रांतधिकारी तृप्ती धोडमीसे यांच्या ...

Challenges, day-long panchnama of stock in rural areas | आव्हाणे, खेडी भागातील साठ्यांचे दिवसभर चालले पंचनामे

आव्हाणे, खेडी भागातील साठ्यांचे दिवसभर चालले पंचनामे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - तालुक्यातील आव्हाणे व खेडी येथे गिरणा पात्रातून अनधिकृत वाळू साठ्यांवर प्रांतधिकारी तृप्ती धोडमीसे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ८०० ते १ हजार ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. ‘लोकमत’ वृत्तानंतर महसुल व पोलीस विभागाकडून सोमवारी रात्री ८ वाजता आव्हाणे येथील वाळू साठ्यांवर धाड टाकण्यात आली. रात्रभर आव्हाणे गावातील गल्लोगल्लीत जावून अनधिकृत साठे जप्त करण्यात आले. मंगळवारी दिवसभर जप्त साठ्यांचे पंचनामे करण्यात आले.

आव्हाणे, खेडी, वडनगरी या भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असून, याबाबत ‘लोकमत’ ने सोमवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून आव्हाणे गावात अचानकपणे जावून, महसुलच्या पथकाने काही साठे जप्त केले होते. यामध्ये सुमारे ८०० ते १ हजार ब्रास वाळूचे साठे जप्त करण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास महसुलच्या पथकाने खेडी येथे जावून त्याठिकाणी देखील साठे जप्त करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाकडून जप्त साठ्यांचे पंचनामे करण्यात आले. मोठ्या प्रमाणात साठे असल्याने सर्व साठ्यांचे पंचनामे दिवसभर सुरुच होते.

महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येईल वाळू

महसुलच्या पथकाने जप्त केलेली वाळू आता शासकीय कामासाठी वापरण्यात येणार आहे. शहराबाहेरून आव्हाणे शिवारातून जाणाऱ्या बायपासच्या कामासाठी जप्त वाळूचा वापर केला जाणार आहे. तसेच उर्वरित वाळू बाबत जिल्हा प्रशासन निर्णय घेणार आहे.

उपसा करणाऱ्यांचा शोध सुरु

आव्हाणे व खेडी या गावात मोठ्या प्रमाणात उपसा सुरु आहे. दरम्यान, महसुलच्या पथकाने जप्त केलेले साठे कोणाचे हे स्पष्ट होवू शकलेले नाही. खासगी जागेवर हे साठे असल्याने साठे करणारे नेमके कोण ? याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. पोलिसांच्या पथकाने गावातील अनेकांशी चर्चा करून, माहिती विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातुनही हा उलगडा होवू शकलेला नाही.

तलाठी कार्यालयापासून १०० मीटरच्या अंतरावर साठे

आव्हाणे येथील तीन वाळू साठे हे तलाठी कार्यालयापासून अवघ्या १०० मीटरच्या अंतरावर सापडले आहेत. विशेष म्हणजे तलाठ्यांसमोर डंपर ये-जा करत असतानाही कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. आता तलाठी कार्यालय परिसरातच वाळू साठे सापडल्याने संबधित तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी आव्हाणे येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

नागझिरी परिसरातून देखील उपसा सुरु

आव्हाणे, बांभोरी भागासह नागझिरी भागातून देखील मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असून, महसुल प्रशासनाने या भागात देखील कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. नागझिरी, खेडी कढोली, दापोरा, वैजनाथ भागातून हा उपसा सुरु आहे.

Web Title: Challenges, day-long panchnama of stock in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.