आव्हाणे, खेडीच्या ग्राम दक्षता समितीच्या सदस्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:16 AM2021-02-12T04:16:22+5:302021-02-12T04:16:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आव्हाणे आणि खेडी खुर्द येथे अवैध वाळू उपसा आणि साठा केल्याच्या प्रकरणात तहसीलदार नामदेव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आव्हाणे आणि खेडी खुर्द येथे अवैध वाळू उपसा आणि साठा केल्याच्या प्रकरणात तहसीलदार नामदेव पाटील यांनी ग्राम दक्षता समिती सदस्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तसेच जे ट्रॅक्टर विनाक्रमांकाचे होते त्या ट्रॅक्टरच्या मालकाला १ लाख १९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तालुक्यातील आव्हाणे आणि खेडी खुर्द काही दिवसांपूर्वी प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे आणि तहसीलदार नामदेव पाटील यांच्या पथकांनी धाड टाकून कारवाई केली होती. त्यात १८ ठिकाणी वाळूचे साठे सापडले होते. ज्यावेळी महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली. तेव्हा आव्हाणे, ता.जळगाव येथील नदीपात्रात बेवारस स्थितीत आढळले होते. त्यावर कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही गावांमध्ये मिळून आढळून आलेल्या १५ संशयितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यापैकी एक आव्हाणे येथील कोतवाल किशोर चौधरी यांनादेखील तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आव्हाणे येथील १७ आणि खेडी येथील एक अशा १८ भोगवटादारांना ज्यांच्या जागेवर वाळूचे साठे सापडले त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
आव्हाणे आणि खेडी खुर्द येथील ग्राम दक्षता समितीचे सदस्य असलेले ग्रामसेवक,पोलीस पाटील, कोतवाल, सदस्य सचिव असलेले तलाठी आणि अध्यक्ष यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यासोबतच आव्हाणे ता. जळगाव येथील पोलीस पाटील पद आतापर्यंत रिक्त होते. मात्र वाळूच्या साठेबाजीचा प्रकार समोर आल्यानंतर वडनगरीचे पोलीस पाटील जितेंद्र पाटील यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे.