आव्हाणे नदीपात्रात वाळू माफियांना पुन्हा तोडला शेतकऱ्यांचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:30 AM2021-03-04T04:30:15+5:302021-03-04T04:30:15+5:30

शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यायला प्रशासन तयार होईना : जेसीबीव्दारे उपसा सुरू लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - तालूक्यातील आव्हाणे, ...

Challenges The sand mafia in the river basin broke the farmers' road again | आव्हाणे नदीपात्रात वाळू माफियांना पुन्हा तोडला शेतकऱ्यांचा रस्ता

आव्हाणे नदीपात्रात वाळू माफियांना पुन्हा तोडला शेतकऱ्यांचा रस्ता

Next

शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यायला प्रशासन तयार होईना : जेसीबीव्दारे उपसा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - तालूक्यातील आव्हाणे, निमखेडी, भोकणी या भागातून सर्रासपणे वाळू उपसा सुरू असून मंगळवारी रात्री अवैध उपसा करणाऱ्या डंपर चालकांनी शेतकऱ्यांचे शेतात जाण्याचे रस्ते पुन्हा तोडले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनदेखील कोणतीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू ऐकूनदेखील घेतली गेलेली नाही. विशेष म्हणजे आव्हाणीचा मक्ता असताना, आव्हाणे व इतर भागातून हा उपसा सुरू असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

गिरणा पात्रातील आव्हाणीचा मक्ता देण्यात आला असून, आता नदीला पाणी असल्याने मक्तेदाराकडून आव्हाणीच्या भागातून उपसा न करता आव्हाणे भागातून उपसा सुरू केला आहे. तसेच हा अवैध उपसा करताना जेसीबीच्या सहाय्याने उपसा केला जात आहे. त्यामुळे अनधिकृतपणे शेकडो ब्रासचा उपसा एका दिवसात होत असतानाही प्रशासन कोणतीही कारवाई करायला तयार नाही. त्यातच मंगळवारी डंपर चालकांनी शेतांकडे जाणारा रस्ता तोडला असल्याने शेतकऱ्यांना शेतांमध्ये जायला रस्ताच शिल्लक ठेवलेला नाही. यामुळे बुधवारी सकाळी काही शेतकऱ्यांनी वाळू माफियांशी हुज्जत देखील घातली. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव मागे हटावे लागले.

वाळू माफियांना बड्या नेत्याचा आशीर्वाद

मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असतानाही धरणगाव तहसील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. तसेच याबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी केल्या जात आहेत. यासह अनेक अधिकाऱ्यांचा समोर हा उपसा सुरू असतानाही कारवाई होत नसल्याने प्रशासनावर कोणाचा दबाव असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील बड्या नेत्याचा वाळू माफियांना आशीर्वाद असल्याचीही माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मक्ता दिला असतानाही मक्तेदाराला जेसीबीने उपसा करता येत नाही, तरीही हा उपसा केला जात आहे.

Web Title: Challenges The sand mafia in the river basin broke the farmers' road again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.