बोंडअळीच्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई देणार : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:15 PM2017-12-05T12:15:44+5:302017-12-05T12:23:00+5:30
जळगावातील पत्रकार परिषदेत महसूलमंत्र्याची माहिती.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.५ : बोंडअळीचा प्रश्न केवळ जळगाव जिल्ह्यापुरता नसून विदर्भ, मराठवाडा व संपूर्ण उत्तर महाराष्ट्रचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्यस्तरावरच याबाबत निर्णय होईल. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, त्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवार, ४ रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत तसेच त्यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत दिली.
नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
ते म्हणाले, गेल्या ३ वर्षात भाजपा-सेना सरकारने शेतकºयांचे नुकसान होऊ दिलेले नाही. आताही बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. चुकीचे बियाणे पोहोचविल्यानेच ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले असून नोटीसही बजावली आहे. कंपन्यांनीही नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे कंपनी किती नुकसान भरपाई देणार? व सरकार किती नुकसान भरपाई देणार? याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित मिळेल.
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सर्व प्रयत्न सुरू
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, चाळीसगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असला तरी शासनाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सर्व प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आता रात्री अंधारात शोध घेऊ शकेल अशी दुर्बिणही घेतली जाणार आहे.