चांदसरची भावी डॉक्टर तरुणी पुण्यात अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 09:49 PM2019-11-25T21:49:12+5:302019-11-25T21:49:22+5:30
जळगाव : पुण्यातील टिळक महाविद्यालयातून इंटर्नशिपच्या ठिकाणी दुचाकीने जात असलेल्या एकता प्रभाकर कोठावदे (वय २६, रा. मूळ चांदसर, ता. ...
जळगाव : पुण्यातील टिळक महाविद्यालयातून इंटर्नशिपच्या ठिकाणी दुचाकीने जात असलेल्या एकता प्रभाकर कोठावदे (वय २६, रा. मूळ चांदसर, ता. धरणगाव) या भावी डॉक्टर विद्यार्थिनीचा मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. हा अपघात पुणे-सातारा रस्त्यावर राजीव गांधी प्राणिसंग्रहालय चौकात झाला.
चांदसर येथील एकता हिचे वडील प्रभाकर वसंत कोठावदे हे शेती करतात. आई मनिषा गहिणी तर भाऊ कुणाल हा उपसरपंच आहे. एकता हिने नाशिक येथे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ती पुणे येथे गेली. ती दोन वर्षापासून टिळक महाविद्यालयात एम.डी.चे शिक्षण घेत होती. इंटर्नशिपसाठी एकता ही तिच्या दुचाकीने (एम.एच.१९ ए.व्ही.९६२६) ने कात्रजकडे जात होती. यादरम्यान सातारा रस्ता, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय चौकात दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या माल मालवाहू (एम.एच.०८ डब्लू ३७४७) या वाहनाने दिलेल्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तत्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.
वाढदिवस आटोपून परतली होती पुण्याला
एकता ही आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांदसर येथे आली होती. ७ नोव्हेंबर रोजी तिचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करुन ११ नोव्हेंबरला पुण्याला परतली होती. आयुर्वेद या विषयात ती एम.डी.शिक्षण घेत होती. शेवटचे दोन महिन्यांचे शिक्षण बाकी होते. मात्र नियतिला काही वेगळेच मान्य होते. सोमवारी अपघाताच्या रुपात काळाने घातलेल्या झडपेत तिचा मृत्यू झाला. माहिती मिळताच कुटुंबिय तातडीने पुण्याला रवाना झाले. पुणे येथून एकताचा चांदसरला आणण्यात येत असून मंगळवारी सकाळी ८ वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.