'चंद्रात्रे दाम्पत्य' रंगलयं योगसाधनेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 02:35 PM2019-06-21T14:35:45+5:302019-06-21T14:36:26+5:30
'योगसाधना' पुस्तकाचे लेखन
जिजाबराव वाघ
चाळीसगाव : योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे आणि मीनाक्षी चंद्रात्रे यांच्या सप्तपदीची रेशीमगाठ 'योगा'शीही बांधली गेलीयं. गेले ४५ वर्ष हे दाम्पत्य एखाद्या व्रतस्थाप्रमाणे योगसाधनेत गढून गेले आहे. विशेष म्हणजे त्यांची ही योग समर्पित पालखी त्यांच्या स्नुषा सविता मानस चंद्रात्रे यांनी गेल्या काही वषार्पासून खांद्यावर घेतली आहे. संपूर्ण चंद्रात्रे कुटुंबच योग साधनेत रंगलयं.
चाळीसगाव पंचक्रोशीत वसंतराव चंद्रात्रे यांची योगाचार्य अशी विशेष ख्याती आहे. गेली ४५ वर्ष ते विनामूल्य योगवर्ग घेत आहे. याचा हजारो लोकांना लाभ झाला असून योग शिबिरांमध्येही ते मार्गदर्शन करतात. मीनाक्षी व सविता या सासू - सुना रोज पहाटे महिलांना योग शिकवितात. यामुळे अनेक महिलांची शारीरिक व्याधीतून मुक्तता झाली असल्याचे त्या सांगतात. ८२ वर्षीय वसंतराव व मीनाक्षी हे दोन्ही ना.बं. वाचनालयात गेल्या ४३ वर्षांपासून मोफत योगाचे वर्ग घेतात. त्यांच्या क्लासमध्ये दरवर्षी योग दिन साजरा केला जातो.
जनतेला आवाहन : योगभवन लोकसहभातून उभारले जाणार आहे. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी १० लाख रुपये देण्याचे आश्वासित केले असून यात जनतेनेही पुढे यावे. यासाठी चंद्रात्रे यांचा जागर सुरू आहे.
चाळीसगावात उभारणार 'योगभवन'
गेल्या काही वर्षात धावपळीच्या जीवनशैलीत योग हा शरीराला फ्रेश करणारा ठरला आहे. अर्थात योगविद्या हा भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे. याच भावनेतून गेली ४५ वर्ष वसंतराव व मीनाक्षी चंद्रात्रे काम करीत आहे. चाळीसगावात 'योग भवन' उभारण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. नेताजी चौकातील बलराम व्यायामशाळेच्या पटांगणावर हे योगभवन उभे राहणार असून त्यासाठी या दाम्पत्याचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी चंद्रात्रे यांच्या प्रयत्नातूनच बलाराम व्यायामशाळेचाही जीर्णोध्दार झाला.
मिसाबंदिवानाचे मानधन दिले योगभवनासाठी
आणीबाणीच्या कालखंडात वसंतराव चंद्रात्रे हे मिसा बंदिवान म्हणून तुरुंगात होते. येथेच ते योग शिकले. तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने मिसा बंदिवानांचा सन्मान करताना त्यांना मानधन देऊन गौरविले. चंद्रात्रे यांनाही एक लाख २० हजारांचे मानधन मिळाले. यातील एक लाख रुपये त्यांनी योगभवनासाठी दिले आहे.
'योगसाधना' पुस्तकाचे लेखन
वसंतराव चंद्रात्रे यांनी आपल्या योगसाधनेचा ४५ वर्षांचा खजिना 'योगसाधना' या पुस्तकात रिता केला आहे. गेल्यावर्षी त्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन झाले. वर्षभरात त्याची यंदा दुसरी आवृत्ती देखील प्रसिद्ध झाली आहे.