चंदूची आज गाव वापसी!
By Admin | Published: March 11, 2017 12:50 AM2017-03-11T00:50:46+5:302017-03-11T00:50:46+5:30
स्वागतासाठी धुळे सज्ज
धुळे : पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेले तालुक्यातील बोरविहीर येथील जवान चंदू चव्हाण शनिवार, ११ रोजी सकाळी १० वाजता शहरात दाखल होणार असून मिरवणुकीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिली.
जवान चंदू चव्हाण यांचे सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील नगावबारी येथे आगमन होईल. तेथून भव्य मिरवणुकीने धुळेकर जनतेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
मिरवणूक जीटीपी चौक, नेहरू चौक, मोठा पूलमार्गे म.गांधी पुतळा चौकात पोहचेल. तेथे म.गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फुलवाला चौक, शहर पोलीस चौकी, पाचकंदील, खंडेराव बाजारमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोहचेल.
तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीचा समारोप होईल, असे अग्रवाल म्हणाले.
पाच महिन्यानंतर वापसी
जवान चंदू चव्हाण २९ सप्टेंबर २०१६ रोजी चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा चालविला होता. त्यास यश मिळून २१ जानेवारी रोजी अमृतसर येथील वाघा बॉर्डर येथे भारताच्या स्वाधीन करण्यात आले.
स्वत: डॉ.भामरे या वेळी उपस्थित होते. त्यानंतर आवश्यक सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी म्हणजे धुळे तालुक्यातील बोरविहीर येथे प्रथमच त्यांचे आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे.