नव्या सर्वेक्षणामुळे जळगाव येथे भाजप उमेदवारीत बदल - गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:39 PM2019-04-05T12:39:19+5:302019-04-05T12:39:46+5:30
स्मिता वाघ यांना बरीच संधी दिली
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात वाघ यांना उमेदवारी दिल्यानंतर बरेच विषय झाले. यावर सर्वेक्षण केले असता ते समाधानकारक नसल्यामुळेच स्मिता वाघ यांची उमेदवारी काढून उन्मेष पाटील यांना देण्यात आली असल्याची भूमिका राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.
जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवारी बदलानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रीया, झालेली नाराजी याबाबत महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, स्मिता वाघ या पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यामुळेच त्यांना पक्षाने संधी दिली होती. मात्र आलेले रिपोर्ट फारसे समाधानकारक नसल्याने पक्षाने तातडीने पुन्हा सर्वेक्षण करून घेतले. यातही अहवाल समाधानकारक नव्हता. त्यामुळे सर्वांशी चर्चा करून तातडीने उमेदवार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला व उन्मेष पाटील यांना संधी दिली आहे. यात नाराज होण्याचा विषय नाही.
पक्षाने स्मिता वाघ यांना बरीच संधी दिली आहे. आजही त्या विधान परिषदेत आमदार आहेत. त्यांचे पती उदय वाघ हे पाच वर्षांपासून जिल्हाध्यक्ष आहेत. यासह त्यांना राज्य पातळीवरही पदे दिली आहेत. त्यांचे कार्य पाहूनच पक्षाने वेळोवेळी संधी दिली असल्याचेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.