स्वत:मध्ये बदल करा म्हणजे दु:ख नाहीसे होईल -प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 02:52 PM2020-08-31T14:52:36+5:302020-08-31T14:53:39+5:30
स्वत:मध्ये परिस्थितीनुरूप बदल केले पाहिजे. म्हणजे दु:ख नाहीसे होईल, असे प्रतिपादन प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी केले.
भुसावळ : आजच्या परिस्थितीत चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींकडे माणसाचे मन झुकलेले आहे. आपल्या आजूबाजूला नेहमीच नकारात्मक गोष्टी ऐकण्यास व पहावयास मिळते. यामुळे आपले मनदेखील नकारात्मक होऊन आपल्या मनात द्वंद सुरू होत असतात. मग जीवनात दु:ख येते. या दु:खाला हरवायचे असेल तर मन प्रसन्न ठेवले पाहिजे. स्वत:मध्ये परिस्थितीनुरूप बदल केले पाहिजे. म्हणजे दु:ख नाहीसे होईल, असे प्रतिपादन प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी केले.
रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅलीतर्फे ‘द्वंद जीवनाचे’ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे बारावे पुष्प व समारोपीय व्याख्यान परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.
यावेळी रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांनी समाजमनावर होणाऱ्या वाईट परिणामांना घालवण्यासाठी व जीवन आनंदी करण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
क्लबचे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे म्हणाले की, कोरोनाच्या काळात सर्वजण घरामध्ये लॉकडाऊन झाले होते. या सर्वांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन रुजवला जावा या दृष्टिकोनातून विविध विचारवंतांची व्याख्याने आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारी आयोजित करण्यात आली.
प्रोजेक्ट सेक्रेटरी संजीव भटकर यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहितीदिली. बारावे पुष्प जनार्दन हरीजी महाराजांनी गुंफले. त्यांचा परिचय प्रोजेक्ट कोआॅर्डिनेटर जीवन महाजन यांनी करून दिला.
यावेळी बोलताना जनार्दन महाराज म्हणाले की, जीवन जगत असताना मनामध्ये द्वंद सुरू असते. हे द्वंद्व संपवायचे असेल तर चांगल्या गोष्टी, सकारात्मक विचार केले पाहिजे. यासाठी आपले मन शांत करून प्रसन्न कसे असेल याकडे लक्ष दिले पाहिजे. मन प्रसन्न असेल तर सर्वसिद्धी होतात. मनोबल वाढवले पाहिजे. जीवनातील हे युद्ध जिंकण्यासाठी मनोबल वाढणे आवश्यक आहे. जीवन जगण्याचा मंत्र समजला पाहिजे. मनाला स्थिर करण्यासाठी साधना केली पाहिजे. विज्ञान व अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तर दु:ख मानवनिर्मित असून आनंद ईश्वरनिर्मित आहे. सुखदु:ख सम असले पाहिजे. सकारात्मकतेसाठी स्वत:पासून सुरुवात करा. अंधश्रद्धेने मनोवृत्ती वाढू शकत नाही. घरात प्रेम, जिव्हाळा नात्यात असले पाहिजे कुटुंबामध्ये संवाद घडवून विवाद टाळले पाहिजे. संकुचित मन न ठेवता मनाचा मोठेपणा ठेवा. चांगले आचरण करा. आपल्या अंगी त्याग श्रद्धा प्रेम असले पाहिजे. एखाद्या चित्रात रंग भरल्यानंतर जसे सुंदर दिसते तसेच आपल्या जीवनातदेखील आपण रंग भरले पाहिजे. अडचणींवर मात करत आपण मार्गक्रमण केले पाहिजे. क्षमा करणे हे एक मोठेपण असून यामुळेदेखील दु:खाची तीव्रता कमी होते. महत्त्वाकांक्षा, सन्मान, लोभी वृत्तीचा त्याग करा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरकदेखील समजून घेतला पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे स्वत:चे कुटुंबाचे व समाजाचे जीवन आनंदी होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोजेक्ट चेअरमन योगेश इंगळे यांनी, तर आभार प्रोजेक्ट चेअरमन सुनील वानखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्लबचे सेक्रेटरी राम पंजाबी व प्रोजेक्ट कॉर्डिनेटर प्रदीप सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
२८ हजार प्रेक्षकांनी या व्याख्यानमालेचा घेतला लाभ
कोरोनाच्या काळामध्ये आॅनलाइन झूम अॅप व फेसबुक पेज लाईव्हवरून सुरू व्याख्यानमाला घेण्यात आली. सर्वत्र नकारात्मक भूमिका असताना व कुटुंबामध्ये कलह कमी करण्यासाठी आनंदी जीवनासाठी या व्याख्यानमालेला आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारी वक्ते संवाद साधत होते.
या व्याख्यांमध्ये विविध विचारवंतांनी आपले विचार मांडले आणि या विचारांचा लाभ महाराष्ट्राभरातून २८ हजारावर श्रोत्यांनी घेतला. ही सर्व व्याख्याने रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळ या फेसबुक पेजवर उपलब्ध असून याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.