लॉकडाऊन काळात शाळेचे पालटले रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 01:07 AM2020-09-06T01:07:52+5:302020-09-06T01:09:06+5:30
एक छोटं पाऊल मोठा बदल घडवतं असं म्हणतात. असंच छोटं पाऊल उचललं आहे एणगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी !
बोदवड, जि.जळगाव : एक छोटं पाऊल मोठा बदल घडवतं असं म्हणतात. असंच छोटं पाऊल उचललं आहे एणगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी ! लॉकडाऊन कालावधीत शाळा बंद परिस्थितीचा उपयोग करून शाळेचं रुपडं पालटून तिला हायटेकसुद्धा केली.
बोदवड तालुक्यातील एणगाव येथे गोपाळ देवबा ढाके माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून पुरुषोत्तम गड्डम यांनी १ मार्च २०२० रोजी पदभार स्वीकारला. सुरुवातीच्या काळात जुनी इमारत व गळक्या वर्गखोल्या दुरुस्तीचे काम त्यांनी स्वखर्चाने सुरू केले. वर्गखोल्या उत्तम रंगांचा वापर करून भिंती बोलक्या केल्या. संपूर्ण इमारत रंगवून त्यावर चित्रकारांच्या मदतीने निसर्ग चित्रे काढून घेतले. संपूर्ण परिसरासह प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले.
.....आणि लोकसहभाग लाभला
शाळेच्या बाह्यरूपात सकारात्मक व लक्षणीय बदल झाल्याचे दिसून येताच गावकरी आणि माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली. संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांना विश्वासात घेऊन यासंदर्भात चर्चा करण्यात आली. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून मिळालेल्या देणगीतून मग शाळा हायटेक कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित केले.
ग्रामस्थांचे यश-मुख्याध्यापक गड्डम
तंत्रज्ञान दिवसागणिक बदलत असते. त्यानुसार शाळेत संगणक प्रणाली हायटेक केली. लॉकडाऊनच्या काळात याच संगणकावर व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आॅनलाईन क्लासेस सुरू केले. प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्हीद्वारे आनंददायी शिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. ओपन बुक लायब्ररी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना बैठे खेळ खेळण्यासाठी इनडोअर प्ले-स्टेशन सुरू केले आहे. विज्ञान प्रयोगशाळा अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. या संपूर्ण बदलासाठी पैसे उभे करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी मदत केली. आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी तथा भारतातील होरायझन आॅटोमेशन कंपनीचे संस्थापक दीपक लक्ष्मणसिंग पाटील यांनी तथा त्यांच्या मित्रबांधवांनी मोलाची मदत केली आणि शाळा नव्या रुपात हायटेक झाली. त्यामुळे आता शाळेत विद्यार्थी संख्या वाढली आहे. सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व सरपंच अन्नपूर्णा विनोद कोळी आणि गावकरी बांधवांचे भरीव सहकार्य लाभल्याने ही यशोगाथा सिद्धीस आली, अशी माहिती मुख्याध्यापक पुरुषोत्तम गड्डम यांनी दिली.