देशाच्या शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल आवश्यक : अविनाश धर्माधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:25 PM2017-12-05T12:25:04+5:302017-12-05T12:33:16+5:30
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्ह्यातील वरणगावच्या अनिकेतचा आदर्श घ्यावा
किशोरपाटील/आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.५ : देशातील तळागाळातील समाजाचा विकास करायचा असेल तर प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता उंचावली पाहिजे. खाजगी शाळांच्या गुणवत्तेप्रमाणे सरकारी शाळांचीही स्थिती सुधारायला हवी. त्यासाठी देशाच्या शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल आवश्यक आहेत, असे मत भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी सनदी अधिकारी व पुणे येथील चाणक्य मंडळाचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
एसडी सीडतर्फे आयोजित शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यासाठी ते जळगावात आले होते. त्याप्रसंगी त्यांच्याशी झालेला संवाद असा...
प्रश्न - देशाच्या व राज्याच्या शिक्षण पध्दतीत तुम्हाला काही बदल अपेक्षित वाटतात?
धर्माधिकारी- भारताच्या शिक्षण पध्दतीत काळानुरुप काही बदल होताहेत मात्र काळाचे आव्हान पेलेल असे जे आवश्यक बदल आहेत ते होतांना दिसत नाही़ त्यामुळे शासकीय किंवा खाजगी शाळांची तुलना केली तर खाजगी शाळांची गुणवत्ता अधिक आहे़
प्रश्न- बिहारच्या तुलनेत महाराष्ट्र प्रगत असतानाही प्रशासकीय सेवांमध्ये राज्यातील तरुणांचा टक्का कमी आहे, यावर काय सांगाल?
धर्माधिकारी- पूर्वी प्रशासकीय सेवांमधून महाराष्ट्रतून एक-दोन विद्यार्थ्याची निवड होत असे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. उत्तरप्रदेशच्या पाठोपाठ महाराष्ट्र आहे़ स्थिती चांगली नाही मात्र समाधानकारक म्हणता येईल़ राज्यातून यशस्वी झालेले प्रशासकीय अधिकारी उत्तम व स्वच्छ कारभार हाताळताहेत़
प्रश्न- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबद्दल पाहिजे तेवढा आत्मविश्वास नाही, त्याबाबत विद्यार्थ्यांना आपण काय सल्ला देणार?
धर्माधिकारी- बुध्दी प्रत्येकाकडे आहे, मात्र आपण कोणत्या क्षेत्रात तज्ज्ञ आहे. ते ओळखले पाहिजे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही अवघड परीक्षा आहे. ती असलीच पाहिजे कारण त्याव्दारे निवडले जाणारे विद्यार्थी देशाचा कारभार चालवतात़ म्हणून ग्रामीण भागातील मुलांनी आम्हाला जमणार नाही, असे मानण्याचे कारण नाही़ शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मुले स्पर्धा परीक्षेत यश मिळवीत आहेत. यासाठी अर्थात समर्पण, चिकाटी हवीच़ विशेषत: खान्देशातील मुलांसमोर तर वरणगाव येथील अनिकेतचे उदाहरण आहे़ की जो २१ व्या वर्षी युपीएसपीच्या परीक्षेत देशात १९ वा आला. त्यामुळे अनिकेत करु शकलो तर आपण ही करु शकतो, असा आत्मविश्वास मुलांनी बाळगायला हवा़