सीए अभ्यासक्रमात पुढील वर्षापासून बदल
By अमित महाबळ | Published: September 12, 2022 03:38 PM2022-09-12T15:38:45+5:302022-09-12T15:39:08+5:30
भारतीय राज्यघटनेवरील पेपर प्रथमच अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला
जळगाव : सीए अभ्यासक्रमात बदल केला जात असून, प्रॅक्टीकलवर अधिक भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दोन वर्षाची आर्टिकलशिप करावी लागणार आहे. पुढील वर्षापासून हा अभ्यासक्रम लागू होईल, अशी माहिती द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे पश्चिम विभाग (डब्लूआयआरसी) चेअरमन सीए मूर्तझा काचवाला यांनी दिली. ते सीए असोसिएशन जळगाव शाखेत बोलत होते.
काचवाल म्हणाले, की भारतीय राज्यघटनेवरील पेपर प्रथमच अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. फाउंडेशन उत्तीर्ण होईल त्यालाच पुढील संधी मिळतील. आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांच्या बरोबरीने आपला अभ्यासक्रम असावा या पद्धतीने त्याची रचना केली जात आहे. या अभ्यासक्रमाला सरकाकडून मंजुरी मिळताच २०२३ पासून तो लागू केला जाईल. त्यांनी जळगाव शाखेच्या कामगिरीचे व विविध उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी सचिव श्वेता जैन, पियूष चांडक, पिंकी केडिया, जळगाव शाखेचे अध्यक्ष विक्की बिर्ला, सचिव अभिषेक कोठारी उपस्थित होते.
युडीआयएनचा आग्रह धरा
सीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना डिजिटल लर्निंग हबवर अभ्यास साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच आर्थिक ताळेबंदावर सीएच्या स्वाक्षरीखाली युडीआयएन क्रमांक द्या. त्याची पडताळणी ऑनलाइन करता येते. यामुळे चुकीचे प्रकार टळतात, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पहिल्यांदाच भारताला यजमानपद
भारतात पहिल्यांदाच १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान, वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटंट मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी ११० देशातून उपस्थिती लाभणार असून, सहा हजार जण प्रत्यक्ष, तर १० हजार जण व्हर्च्युअली हजेरी लावतील, असेही काचवाला यांनी सांगितले.
... तर सदस्यावर कारवाई
एखाद्या सदस्याविरोधात कमिटीकडे तक्रार आल्यास त्याची दखल घेऊन चौकशी केली जाते. यामध्ये तथ्य आढळून आले, तर सदस्यत्त्वाचे निलंबन, डिबार किंवा आर्थिक दंड यासारखी कारवाई करण्यात येते. आजपर्यंत अनेक कारवाया झालेल्या आहेत, असेही काचवाला यांनी सांगितले.