दररोज नियमांमध्ये बदल, व्यापारी वर्ग त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:15 AM2021-05-22T04:15:51+5:302021-05-22T04:15:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ...

Changes in the rules every day, the merchant class suffers | दररोज नियमांमध्ये बदल, व्यापारी वर्ग त्रस्त

दररोज नियमांमध्ये बदल, व्यापारी वर्ग त्रस्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू असली तरी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून महापालिका व पोलीस कर्मचाऱ्यांकडून सकाळी दहा वाजतापासून दुकाने बंद करण्यासाठी आग्रह केला जात असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून केला जात आहे. इतकेच नव्हे, कधी महापालिका तर कधी पोलीस कर्मचारी दररोज वेगवेगळे नियम आणून व्यापाऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोपदेखील केला जात आहे. इतकेच नव्हे, दुकानांसमोर ग्राहक नसले; मात्र इतर नागरिक उभे असले तरीही दुकानदारांना दंड केला जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यातही अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते अकरा याच वेळेत सुरू ठेवावी, असे बंधन करण्यात आले. त्यात आता गेल्या सोमवारपासून जळगावात कडक नियम लागू करण्यात आले असून, महापालिका व पोलीस कर्मचारी अधिकच वेठीस धरत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सकाळी दहापासून दुकाने बंदचा आग्रह

अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी अकरा वाजतापर्यंत सुरू ठेवण्याची मुभा आहे; मात्र यामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून महापालिका तर कधी पोलीस कर्मचारी येऊन सकाळी दहा वाजतापासून दुकाने बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागत आहे. मुळात सकाळी सात वाजता दुकान उघडले तरी त्यावेळी ग्राहकी नसते. साडेनऊ वाजतापासून ग्राहक येण्यास अधिक प्रमाण वाढते. त्यात एकाच वेळी जास्त ग्राहक आल्याने साडेनऊ ते ११ या काळात एवढी ग्राहकी करणे व्यापाऱ्यांनादेखील अवघड होत आहे. यात अकरा वाजता एखाद्या ग्राहकाचे अर्धे सामान वाहनात टाकायचे राहिल्यास तेदेखील ग्राहकाला नेऊ दिले जात नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गर्दीमुळे दुकानदारांना दंड

अकरा वाजतानंतर दुकान बंद केले व समोर येणारे-जाणारे नागरिक असले तरी त्यामुळे संबंधित दुकानदाराला जाब विचारला जाऊन एक तर दुकान सील करणे किंवा दंड करण्यात येत आहे. यामध्ये पुढील त्रास टाळण्यासाठी अनेक व्यापारी दंडाची रक्कम देऊन मोकळे होतात; मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने समोर उभे राहणाऱ्या नागरिकांना व्यापाऱ्यांनी कसे थांबवावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यामध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आले असता ते वेगळे नियम सांगतात व पोलीस कर्मचारी आले असता ते वेगळे नियम सांगतात‌. यामुळे काय करावे, असा प्रश्न व्यापाऱ्यांकडे उभा राहिला आहे.

माल उतरविण्यास अडथळे

जळगावात देशाच्या विविध भागातून वेगवेगळ्या प्रकारचा माल येत असतो. सध्या सकाळी अकरा वाजतानंतर दोन तास माल उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये एखादे वाहन आले व दोन तासात त्यातील माल उतरविताना थोडाफार माल उतरावयाचा राहिला तरी तो उतरविण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले वाहन उर्वरित माल घेऊन दुसऱ्या दिवसापर्यंत कसे थांबू शकेल, असा प्रश्न दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी उपस्थित केला आहे. शासन, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन व्यापारीवर्ग करीत असून, त्यांनाही सहकार्य करावे, अशी मागणी पगारिया यांनी केली आहे.

Web Title: Changes in the rules every day, the merchant class suffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.