राजधानी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:12 AM2021-01-09T04:12:27+5:302021-01-09T04:12:27+5:30
जळगाव : गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या राजधानी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात ९ जानेवारीपासून बदल करण्यात येत असून, दिल्लीला जाण्यासाठी ही गाडी ...
जळगाव : गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या राजधानी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात ९ जानेवारीपासून बदल करण्यात येत असून, दिल्लीला जाण्यासाठी ही गाडी जळगावला अर्धा तास लवकर येणार आहे. तर गाडीच्या वेगातही वाढ करण्यात येत असल्यामुळे ही गाडी दिल्लीलाही एक तास लवकर पोहोचणार आहे.
कोरोनामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेली राजधानी एक्स्प्रेस गेल्या वर्षी ३० डिसेंबरपासून पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिल्लीला जाणे सोयीचे झाले आहे. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने या गाडीच्या वेळापत्रकातही बदल केला असून, नव्या वेळापत्रकानुसार दिल्लीला जाण्यासाठी ही गाडी जळगाव स्टेशनवर रात्री सव्वानऊ वाजता न येता पावणेनऊ वाजता येणार आहे. तर अपची राजधानी एक्स्प्रेस दिल्लीहून जळगावला येताना सकाळी सहा वाजता न येता, पावणेसहा वाजता येणार आहे. मिनिट टू मिनिट आणि फक्त मोजक्याच स्टेशनवर थांबा असल्यामुळे दिल्लीला अवघ्या १५ तासांत जाणे सोयीचे झाले आहे.
इन्फो :
वेग वाढविल्यामुळे दिल्लीला एक तास लवकर पोहोचणार
रेल्वे प्रशासनाने या गाडीच्या वेळापत्रकात बदल केला असून, गाडीचा वेगही वाढविला आहे. जळगावहून रात्री सव्वानऊ वाजता निघाल्यानंतर दिल्लीला दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता ही गाडी पोहोचायची. मात्र, आता गाडीचा वेग वाढविल्यामुळे दिल्लीला ही गाडी सकाळी ११ वाजता न पोहोचता, १० वाजता पोहोचणार आहे. तर जळगावहून मुंबईला जाण्यासाठी दुपारी १२ वाजता न पोहोचता, सकाळी सव्वाअकरा वाजता पोहोचणार आहे. दरम्यान, नव्या वेळापत्रकानुसार या गाडीला मध्य प्रदेशातील ग्वालियर या स्थानकावरही थांबा देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.