कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारकाच्या आराखड्यात बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 11:50 PM2019-12-02T23:50:32+5:302019-12-02T23:50:48+5:30
बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम केवळ साडेनऊ ते दहा कोटींच्या निधीसाठी हे काम रखडले होते.
जळगाव : असोदा येथे उभारण्यात येत असलेल्या खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम कमी निधीत व्हावे या हेतूने स्मारकाच्या मूळ आराखड्यात प्रशासनाने परस्पर बदल केला. त्यामुळे शासन व प्रशासनाची या स्मारकाप्रती असलेली अनास्था उघड झाली आहे. याबाबत नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर आता निधीसाठी शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
३ डिसेंबरला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकासंदर्भात स्मारक समितीच्या सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा केली. त्यावर निधीसाठी सुमारे २३ कोटींचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम केवळ साडेनऊ ते दहा कोटींच्या निधीसाठी हे काम रखडले होते. आता या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण बजेट २३ कोटींवर गेले आहे.
- खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची ३ डिसेंबर रोजी पुण्यतिथी आहे. त्यांचे स्मारक जळगावनजीक असोदा येथे होत आहे. त्यासाठी शासनाने निधीसाठी हात आखडता घेतला आहे.
- स्मारकाचे काम मूळ आराखड्यानुसारच होईल, अशी मागणी समितीने व नागरिकांनी केल्यावर प्रशासनाने तसे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात अॅम्पीथिएटरवर पत्रे टाकण्यात आले. तर पुढील बाजूने केवळ स्लॅब टाकण्यात आला. उपलब्ध निधीतून केवळ उंची १० मीटरने कमी केलेल्या इमारतीचेच काम झाले आहे. तर सुशोभिकरणाचे काम करण्यासाठी निधीच शिल्लक नाही. त्यामुळे याबाबत सुधारीत प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे स्मारक समितीचे किशोर चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.